राजस्थानांतील बिकानेर येथून ३० किमी अंतरावर असलेल्या देशनोक येथे करणीमाता मंदिर आहे. या मंदिरात २०.००० हून अधिक उंदरांचा वावर असतो. या उंदरांना तिथे पवित्र मानले जाते. त्यांना ‘कब्बा’ म्हणून संबोधले जाते. हे उंदीर संपूर्ण मंदिरात फिरत असतात. मंदिरात येणारे भक्त पायाखाली उंदीर येणार नाही या सावधपणाने वावरत असतात. उभ्या असलेल्या भक्ताच्या पायावरून उंदीर स्वच्छंदपणे उड्या मारून पसार होतात, पण ते कोणालाही इजा करीत नाहीत.
या उंदरांमध्ये चार-पाच पांढरे उंदीरही आहेत. ज्यांना त्या पांढऱ्या उंदरांचे दर्शन घडते ते भाग्यवान समजले जातात. ही करणीमाता देवी बिकानेर राजघराण्याची कुलदेवता आहे. या मंदिरातील उंदरांना एका मोठ्या चांदीच्या परातीत दररोज दूध पाजले जाते. जगभरातील लोक मंदिराच्या या वैशिष्ट्यामुळे मोठ्या संख्येने भेट द्यायला येतात.