चटका बसणं ही आपल्यासाठी तशी नित्याची बाब, मात्र भाजल्यामुळे शरीरावर जेव्हा जखमा होतात तेव्हा त्या रुग्णांसाठी प्रचंड वेदनादायी असत. डॉ. माधुरी यांनी अशा रुग्णांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी अनेकांच्या सहकार्यातून, स्वतःच्या अभ्यासातून आणि संशोधनातून प्रत्यक्षात आणल्या आहेत.केळीच्या पानांचं जगातल सर्वात स्वस्त ड्रेसिंग असो, प्रयोगशाळेतील त्वचेचे रोपण असो, पहिली त्वचादान पेढी सुरु करणं असो, भाजलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षात आणणाऱ्या शल्यचिकित्सक आहेत डॉ. माधुरी गोरे.
डॉ. माधुरी यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे, केळीच्या पानांचं ड्रेसिंग. त्यांनी केळीच्या पानाच्या पाठीमागील भागावर बँडेजचं कापड खळीनं चिकटवून ड्रेसिंग तयार केलं. पूर्णपणे शास्त्रीय पध्दतीने तयार केलेलं हे ड्रेसिंग वापरण्यास सोपं, काढताना वेदनारहित, जखमेवर उपयुक्त, बनवण्यास सोपं आणि मुख्य म्हणजे सहज उपलब्ध असल्याचं सिद्ध झालं आहे. आजही हे जगातील सर्वात स्वस्त ड्रेसिंग मानलं जातं. यावरील त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. या ड्रेसिंगचा वापर सर्वसामान्यांसाठी करता यावा यासाठी त्यांनी याचं पेटंट घेणंही नाकारलं, त्यामुळेच आज भारताबरोबर परदेशातही याचा वापर केला जातो. या संशोधनासाठी २००० मध्ये डॉ. माधुरी यांना अखिल भारतीय शल्यचिकित्सक परिषदेत 'डॉ. रंगाचारी सन्माना' ने गौरविण्यात आलं.
डॉ. माधुरी यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस' च्या मदतीने प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या बाह्यत्वचेचे, रूग्णाच्या जखमेवर रोपण करण्याचा भारतातील पहिला प्रयोग १९९५ मध्ये केला. मात्र, ही प्रक्रिया अतिशय खर्चिक असल्याने सामान्य रुग्णांना परवडणारी नव्हती. डॉ. माधुरी यांचा ध्यास होता तो स्वस्त आणि सर्वांना परवडेल अशा उपचारांचा. त्यांचे भाजण्यावरच्या उपचार पद्धतीसह पन्नासहून अधिक शोधनिबंध वेगवेगळ्या वैद्यकीय नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत.
रूग्णालयातून निवृत्त झाल्यावरही त्वचादानावर डॉ. गोरे आजही समुपदेशन, मार्गदर्शन आणि जनजागृती करत आहेत. त्यांच्या या संशोधनाचा, जनजागृतीचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना होवो, ही शुभेच्छा !
डॉ. माधुरी गोरे : ९८२१४२०२४७
दृष्टी,नोव्हेंबर २०२३, लोकसत्ता २०.१०.२३