एक हलवाई दुकानात मिठाई विकत होता. दोन मुले खरेदीच्या बहाण्याने त्याला निरनिराळ्या मिठाई प्रकारांचे भाव विचारात होती. गप्पा मारता मारता एकाने शिताफीने मूठभर पेढे चोरले व आपल्या मित्राजवळ दिले. त्याने ते खिशात ठेवले. इतक्यात हलवायाची नजर पेढ्यांच्या थाळीवर गेली. पेढे थोडे कमी झाल्याचे त्याच्या लक्षात आले.त्या मुलांखेरीज दुसरे गिऱ्हाईक तिथे नव्हते. साहजिक संशयाची सुई त्यांच्याकडे वळली. जरा दटावून त्याने एका मुलाला पकडले आणि विचारले, “बोल कुठे आहेत पेढे?” तो म्हणाला, “शप्पथ, माझ्याजवळ नाहीत”. दुसऱ्या मुलाला विचारल्यावर तो म्हणाला, “मी खरं सांगतो, मी पेढे चोरले नाहीत”.
हलवायाने दुसऱ्या मुलाची झडती घेतली तेव्हा त्याच्या खिशात पेढे सापडले. “हे काय? खोटं बोलताना लाज वाटत नाही?’ हलवायाने संतापून विचारले.
त्यावर तो मुलगा म्हणाला, “पेढे माझ्याजवळ असले तरी मी चोरलेले नाहीत. मी तेच सांगत होतो”. त्यावर दुसरा मुलगा म्हणाला, ‘माझ्या खिशात तर मिळाले नाहीत ना? म्हणजे माझ्याजवळ नाहीत; मी तेच तर तुम्हाला सांगत होतो.” हलवाई म्हणाला, “तुम्ही शब्दांची कसरत करुन खरं बोलल्यासारखं दाखवत आहात. पण तुम्ही चोरी केली आहे, तुम्ही दोघेही खोटारडे आहात. चोरणारा आणि चोरीचा माल लपवून ठेवणारा सारखेच गुन्हेगार असतात. तुम्ही मला किंवा जगाला एकवेळ फसवू शकाल पण स्वत:ला फसवू शकणार नाही”.
तात्पर्य- प्रामाणिकपणा वागण्यात दिसायला हवा; नुसते शब्दांचे बुडबुडे नकोत. तुम्ही जर सचोटीने वागलात तर स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नसते.
विद्याभारती प्रकाशन