सिद्धेश साकोरे ठरला ‘लँड हिरो’

16 Oct 2024 15:53:42
 
 शिवनेरी :  मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या सिद्धेश साकोरे या तरुणाने नोकरीची कास न धरता गावात राहून नैसर्गिक शेती करण्याचा आणि आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्याचा निर्णय घेतला. या उद्देशानेच त्याने 'अॅग्रो रेंजर्स' संस्थेची स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून सिध्देश आज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत आर्थिक पाठबळदेखील देण्याचे काम करत आहे. स्वतःच्या पडीक रानमाळात त्याने 'अॅग्रोफॉरेस्ट्री' म्हणजेच मिश्रफळ पीक बाग लागवडीचे तंत्र वापरले. परिसरातील शेतीतील पीकपद्धती. माती, पाणी, रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा वापर याचा अभ्यास करून सिद्धेशने शेतीचा कर्ब ०.०३ या धोकादायक पातळीपासून ०.१ या सुरक्षित पातळीपर्यंत आणला. यासाठी त्याला संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या UNCCD तर्फे ‘लँड हिरो’ हा सन्मान देण्यात आला
सिद्धेश साकोरे याने अॅग्रो रेजर्स संस्थेमार्फत आपले सहकाऱ्यांच्या मदतीने सध्या शिरूर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत शेतजमिनीच्या मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी काम सुरू केले आहे. वर्षभरात तब्बल १०० एकर जमिनीवर त्याने  काम केले आहे. या जमिनीवर अॅग्रोफॉरेस्ट्री म्हणजेच मिश्रफळ पीक बाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत असताना फळझाडे, नैसर्गिक बी-बियाणे वाटप करणे, ड्रीपची सुविधा निर्माण करून देणे, जैविक खते, कंपोस्ट खतेदेखील मोफत वाटप केली जातात.
एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात तयार होणाऱ्या शेतीमालाच्या विक्रीसाठी मदत केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार खते-औषधे वापरून मातीची ढासळलेली गुणवत्ता पूर्ववत करणे आणि शेतकऱ्याचे उत्पादन दोन लाखापर्यंत वाढविणे या उद्देशाने सिध्देश सध्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम   करीत आहे. परिसरातील ७०  ते ८० शेतकऱ्यांच्या शेतात अॅग्रोफॉरेस्ट्री विकसित करण्यात आली असून तब्बल ४० हजार फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने आंबा, लिंबू, आवळा, सीताफळ, चिकू, पेरू, चिंच, डाळिंब, शेवगा, पपई अशी ३० प्रकारची जैवविविधता असलेली झाडे लावण्यात आलेली आहे. शेतीतील रोजगार निर्मितीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे हाच उद्देश घेऊन सिद्धेश सध्या काम करत आहे.

सकाळ २२.६.२४

Powered By Sangraha 9.0