ढोलाचा आवाज ऐकू येणारे शिवमंदिर

24 Oct 2024 10:27:01
 
देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक रहस्यमय आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. यातील अनेक मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, या मंदिरातील दगडांवर थाप मारल्यावर त्यातून ढोलाचा आवाज येतो.  हे एक शिवमंदिर आहे, जे आशियातील सर्वात उंच
शिवमंदिर असल्याचे म्हटले जाते.
हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन येथे आहे.
या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते. त्याचे नाव जाटोली शिवमंदिर. दक्षिण द्रविड शैलीत बांधलेल्या या मंदिराची उंची अंदाजे १११ फूट आहे. मंदिराची इमारत हा बांधकाम कलेचा एक अनोखा नमुना आहे.
या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की भगवान शिव पौराणिक काळात येथे आले होते आणि काही काळ राहिले होते. पुढे १९५० च्या दशकात स्वामी कृष्णानंद परमहंस नावाचे बाबा येथे आले, ज्यांच्या मार्गदर्शनाने जाटोली शिवमंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले. त्यांनीच १९७४ साली या मंदिराची पायाभरणी केली. १९८३ साली त्यांनी समाधी घेतली. जाटोली शिवमंदिर पूर्ण होण्यासाठी सुमारे ३९ वर्षे लागली. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर देश-विदेशातील भाविकांनी दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले आहे. त्यामुळे ते बांधण्यासाठी तीन दशकांहून अधिक काळ लागला.
या मंदिरात ठिकठिकाणी विविध देवी-देवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत, तर मंदिराच्या आत स्फटिक रत्न शिवलिंगाची स्थापना केली आहे. याशिवाय भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीही येथे स्थापित करण्यात आल्या आहेत. मंदिरावर ११  फूट उंच सोन्याचा कलश आहे.
अमर उजाला ९.५.२१
Powered By Sangraha 9.0