भारतातील पहिले अभियंता भारतरत्न डॉ. विश्वेश्वरैय्या

SV    27-Oct-2024
Total Views |
 
 १५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा हा जन्मदिवस. थोर देशभक्त आणि अभियंता विश्वेश्वरैय्या यांचा जन्म ५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहल्ली या छोट्याश्या गावात झाला.
त्यांचे वडील विद्वान संस्कृत पंडित होते. घरची परिस्थिती हलाखीची, तरीही त्यांनी मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. विश्वेश्वरैय्या यांनीही तालुक्याला एकटे राहून आपले शिक्षण अव्वल गुणांनी पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी बंगळुरुला आले. तिथेही त्यांनी विशेष गुणवत्तेसह (बी.ए.) कला शाखेची पदवी मिळवली. पदवीधर झाल्यावर त्यांना तंत्रशिक्षणाची आवड निर्माण झाली. पण तंत्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी म्हैसूरच्या राजाला विनंती केली. म्हैसूरच्या राजाने त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन पुण्याला पाठवले. त्यांनी अभियांत्रिकी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम क्रमांक पटकावला. १८८४ साली सरकारने त्यांची सहाय्यक अभियंता या पदावर नेमणूक केली. तिथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एक अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिती केली. यामुळे विशिष्ट पातळीवरील अतिरिक्त पाणीच वाहून जाई. या डिझाइनचे नाव पुढे 'विश्वेश्वरैय्या गेट' असे झाले.
       १९०७ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर निजाम सरकारने त्यांची विशेष सल्लागारपदी नियुक्ती केली. तिथे त्यांनी हैदराबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधून हैदराबाद शहर पूरमुक्त केले. म्हैसूरचे मुख्य अभियंता असताना त्यांनी तिथे कृष्णराज सागर धरण, वृंदावन गार्डन बांधले पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांचीच देणगी आहे. म्हैसूरचे पद सोडल्यावर त्यांनी अभियांत्रिकीच नव्हे तर उद्योग, शेती, नगरसुधारणा या योजनेत मोलाचे कार्य केले.
     आकर्षक व्यक्तिमत्वाचे  विश्वेश्वरैय्या हे उच्चविद्या-विभूषित असूनही अतिशय साधे होते. म्हैसूरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. वयाच्या ९४ व्या वर्षी भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या             १०१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
                                       
     अभिजीत भारत.कॉम १५.९.२२