शरद ऋतू म्हणजे पानगळीचे दिवस. झाडाखाली पाने साचणे आणि वाळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण मोठ्या प्रमाणात पाने गळल्यावर ती तेथून उचलणेही आवश्यक आहे. डोंगराळ भागात ही कोरडी पाने सरपण म्हणून जाळली जातात तर शहरांमध्ये लोक ही पाने वाळल्यावर कचरा म्हणून जाळून टाकतात. दोन्ही बाबींमुळे पर्यावरणाचा नाश होतो.
सध्याची मोठी समस्या म्हणजे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. ती पूर्ववत करण्याची नितांत गरज आहे, जेणेकरून वृक्षारोपणाचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील.
अनेक संस्था या दिशेने काम करत आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'द समझ', या स्वयंसेवी संस्थेने पर्यावरण संरक्षण आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी 'लीफ बँक' नावाची बँक स्थापन करून एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
लीफ बँकेत जी व्यक्ती पाने जमा करते तिला एक सर्टीफिकेट दिले जाते. वाळलेल्या पानांपासून या बँकेत खत तयार केले जाते. पुढच्या वर्षी ती व्यक्ती या बँकेकडून व्याज म्हणून पानांपासून तयार केलेले कंपोस्ट म्हणजे सेंद्रिय खत घेऊ शकते. या बँकेची सेवा पूर्णपणे मोफत आहे.
२०२२ मध्ये 'प्रोजेक्ट स्वर्णपात' या नावाने संस्था सुरू झाली. नंतर तिचे बँकेत रूपांतर झाले आणि तेव्हापासून तिचे नाव 'लीफ बँक' झाले. सन २०२४ मध्ये या बँकेने १७० किलो खत तयार करून लोकांना वितरित केले आहे. हे काम दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागात - द्वारका, आग्नेय - आश्रम, किलोकरी, जंगपुरा इत्यादी ठिकाणी केले जाते.
वितरणानंतर उरलेले खत यावर्षीच्या पावसाळ्यात लागवडीसाठी वापरण्यात येणार आहे. 'द समझ' या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक आर.जे. रावत यांच्या मते या मोहिमेमुळे झाडांचे चांगले पोषण होईल, शेतीसाठी चांगल्या दर्जाची खते मिळतील आणि पाने जाळल्याने होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी होईल.
वाळलेल्या पानांचा कंपोस्ट म्हणून वापर करण्याचे अनेक प्रयोग यापूर्वीही झाले आहेत. मात्र, नैसर्गिकरीत्या गळून पडलेल्या पानांची बँक बनवून त्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
दैनिक भास्कर २६.६.२४