दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानविरुद्ध अणु -बाँबचा उपयोग केला, नागासाकी आणि हिरोशिमा ही शहरे उद्ध्वस्त झाली, लाखो लोक मारले गेले, पराभव, दुःख आणि विनाश यामुळे सारा देश होत्याचा नव्हता झाला: परंतु फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या राखेतून जपानने आपले डोके वर काढले. अल्पकाळात तो देश, परत समृद्ध व प्रगत झाला. हा चमत्कार कसा झाला? जपानी जनतेच्या राष्ट्रप्रेमामुळे, उद्योग, कष्ट , सचोटी या गुणांमुळे !
जपानचा पराभव झाल्यानंतर काही दिवसांनी एका अमेरिकन उद्योगसमूहाने आपली शाखा जपानमध्ये उघडली. अमेरिकन प्रथेप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी फक्त पाच दिवसांचा आठवडा ठेवला, दोन दिवस पूर्ण सुट्टी. परंतु जपानी कामगारांनी त्यास विरोध केला. व्यवस्थापकांना आश्चर्य वाटले. त्यांनी कामगारांना विचारले, “तुमचा विरोध कशासाठी आहे? आम्ही तर तुम्हाला आराम देत आहोत. तुम्ही उलट खूश असायला हवं." सर्व कर्मचारी एका सुरात म्हणाले, "आरामामुळे आम्ही आळशी बनू, आमचे राष्ट्रीय पतन होईल, आरोग्य धोक्यात येईल, फालतू गोष्टीवरील खर्च वाढेल, जी सुट्टी, जो आराम आम्हाला वाईट सवयी लावेल, आमची शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती बिघडवेल तो आम्हाला नको आहे. आठवड्यातून एक सुटी आम्हाला पुरेशी आहे." अमेरिकन व्यवस्थापकांनी नक्कीच मनातल्या मनात जपानी जनतेच्या राष्ट्रीय चारित्र्याला अभिवादन केले असेल.
तात्पर्य: ज्या देशातील लोक कष्ट व उद्योग यांची कास धरतात, त्यांचा विकास झाल्यावाचून राहत नाही. घाम गाळणाऱ्यालाच सिद्धी माळ घालते. 'उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी' हेच खरे.
अनमोल बोधकथा