शाळेतील कचरा व्यवस्थापनाच्या शिल्पकार - शिक्षिका स्मृती वावेकर

18 Nov 2024 10:04:17
 
 गोवंडी एज्युकेशन सोसायटीच्या एका शाळेचे सगळ्यांनी अनुकरण करावे अशी ही यशोगाथा! रा. सो. टाहिलियानी माध्यमिक विद्यालयात २०१६ साली कचरा व्यवस्थापनाची सुरुवात अगदी प्रायोगिक तत्वावर झाली. सुरुवातीला ओला व सुका कचरा वेगळा केला जायचा. सुक्या कचऱ्यात कागद, प्लॅस्टिक, लोखंड, इ-कचरा,                 टेट्रापॅकचा भरपूर समावेश असायचा. या  कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक वर्गात दोन स्वच्छतादूत नेमण्यात आले. शिक्षक मदतीला होतेच. व्याख्याने, दिंडी, विविध स्पर्धा, प्रदर्शने यातून जागृती करण्यात आली.  
'कचरा व्यवस्थापन प्रकल्प' प्रमुख वावेकर बाईंनी 'कागद वाचवा, झाडे वाचवा' असे घोषवाक्य लिहिलेला डबा प्रत्येक वर्गात ठेवला. विद्यार्थ्यांनी कागद फाडू नयेत याकडे  शिक्षक लक्ष ठेवत होते. 'कमीत कमी कागद गोळा करणारा वर्ग' अशी स्पर्धा घेण्यात आली. वर्गात जमा होणाऱ्या कागदांचे वजन दर शनिवारी स्वच्छतादूत करत आणि त्यांची  नोंद ठेवत असत.
विज्ञानदिनी फिरता चषक देऊन बक्षीसप्राप्त  वर्गाचा सन्मान करण्यात आला.  वर्षभरात गोळा झालेल्या कागदांपासून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रतिकृती, गाळण कागद व शोभेच्या  वस्तूंची निर्मिती केली. पुढील वर्षी नगण्य कागद कचरा निर्माण झाला.
शाळेत गोळा होणारे प्लॅस्टिक, लोखंड,   इ-कचरा, टेट्रापॅक हे समाजसेवी संस्थाना पुनर्वापरासाठी दिले जाते. याचे फलित म्हणजे पाचवीचा वर्ग टेट्रापॅक पासून बनवलेले बाक       वापरतो. आठवी, नववीचे विद्यार्थी ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करून ते  शाळेच्या बागेसाठी वापरतात.
गोवंडी एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, शाळेच्या मुख्याधापिका, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी यांच्या सहभागामुळे कचरा व्यवस्थापन प्रकल्प उत्तमरीत्या कार्यान्वित आहे. शाळेला २०२१-२२ साली 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार आणि इतरही पुरस्कार मिळाले आहेत.
भारतीय शिक्षण जुलै,२०२४
   (स्मृती वावेकर ९५९४२ ८००३३)


Powered By Sangraha 9.0