भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या उपासना पंथांनी मांडलेले तत्वज्ञान वरकरणी वेगळे भासत असले तरी ते तसे वेगळे नसतेच, त्यामुळे त्यातील साम्य प्रत्ययाला आल्यावर वाटणारा विस्मय अनाठायी म्हणता येणार नाही !
काळाच्या ओघात सुरुवातीला या ज्ञानाचा पूर्वापार मौखिक पद्धतीने प्रसार झाला. तसं होताना स्वाभाविकपणे व्यक्तिसापेक्ष पद्धतीने त्यात आणखी काही जोडले किंवा वगळले गेले असावे. तरी गुरुशिष्य परंपरेने हे ज्ञान पुढेपुढे चालत गेले.
आपल्या सनातन धर्मात परमात्मा हा निराकार मानला गेला आहे. सगुण भक्तीच्या मिषाने त्याला विविध आकारात आणि विविध स्वरूपात कल्पिले गेले. तसेच परमात्म्याला वेगवेगळी नावेही ठेवण्यात आली. काही नावं पुल्लिंगी तर काही स्त्रीलिंगी असली तरी परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे त्याला अमुक एक लिंग धारण करणारा असे मानता येत नाही. सगुण भक्ती करणारे पंथ तयार झाल्यानंतर त्यांची दैवतभेदाने वेगळी ओळख निर्माण झाली. पण हा परमात्मा अभेद तत्वानेच नटलेला आहे. त्यामुळे प्रसंगवशात नाम वा रूप तसेच वेगळे संबोधन वापरल्याने त्याच्या तत्वाला कोणतीही बाधा निर्माण होत नाही. पंथ आणि संप्रदायात वेगळी ओळख व वेगळेपणा असला तरी मूळ अध्यात्म आणि उपदेशात वेगळेपण असू शकत नाही. वारकरी पंथात 'रामकृष्णहरी' हा मंत्र बनला आहे आणि समर्थ रामदासांनीही समर्थ संप्रदायात या तिन्ही नामांत अभेद मानून प्रसंगी रामनामासोबत अन्य नामांचाही वापर केलेला आहे.
याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या पहिल्या अभंगात सांगतात :
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी |
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||१||
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
यावर समर्थ रामदास म्हणतात :
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी|
यापुढे समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात
न बोले मना राघवेवीण काही |
जनी वाऊगे बोलता सुख नाही ||२३||
तर यावर माऊली म्हणतात
अनंत वाचाळ बरळती बरळ |
त्या कैसा दयाळ पावेल हरि || ३.७ ||
अशातऱ्हेने भाव प्रगट करण्याची रीत आणि भाषा निराळी असली तरी शेवटी ज्या परमात्म्यासाठी भावना व्यक्त केल्या जातात तो एकच असतो हेच यावरून आपल्याला समजते.
(संदर्भ : संतांचे समरसता सूत्र)