पावसाळा सुरू झाला की अनेक रानभाज्या उगवतात. त्यातील एक औषधी गुणधर्म असलेली भाजी म्हणजे करटुली! अकोले जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावचे श्रीकृष्ण लांडे हे पाच एकर शेती असलेले शेतकरी. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात पिके घेऊनही पुरेसे उत्पन मिळत नव्हते. नवीन पिकाचा शोध घेत असताना मराठवाड्यातील शेतकरी करटुल्याचे पीक घेतात असे समजले. त्यानुसार मागील चार वर्षे ते करटुल्याचे पिक घेतात. १० गुंठ्यांवरून आता ही लागवड २० गुंठ्यांवर आली आहे. एकदा लागवड केल्यावर हे पीक अनेक वर्षे उत्पादन देत राहते. प्रत्येकी चारशे फूट लांबीच्या चार ओळी , दोन ओळीत सहा फूट अंतर, दोन झाडांमध्ये चार फूट अंतर ठेवले आहे. सऱ्या पाडून, शेणखत घालून सिंचन केले ; त्यानंतर बी लावले. मे-जूनमध्ये पावसाळी हवा झाल्यावर कंदातून वेल येतात. सिमेंटचे खांब उभारून तारा लावल्या आहेत. त्यावर वेल फिरवले आहेत. नर व मादी दोन्ही प्रकाराचे वेल परागीभवनासाठी लागतात. कडुनिंबावर आधारित कीटकनाशक दोन-तीनवेळा फवारतात. फळमाशीचा उपद्रव थांबण्यासाठी गंध सापळे लावले आहेत. सिंचनासाठी सौरउर्जा पंप बसवला आहे.
श्रीकृष्ण लांडे म्हणाले, “सिमेंट खांब, तारा, मजुरीखर्च वजा जाता पहिल्या वर्षी कमी उत्पादन मिळाले. पण आता चार वर्षानंतर बियाणेही विकून आणि मुख्य शेतीतून मिळून १० गुंठ्यातील शेतीतून एक लाखाचा टप्पा गाठला आहे. अडीच महिने चालणाऱ्या हंगामात तीन ते चार क्विंटल माल हाती येतो. थेट विक्री करतो तसेच रानभाजी महोत्सवात माल विकतो. फळ आकाराने लहान आहे पण गावरान वाण असल्याने औषधी उपयोगासाठी ग्राहकांची पसंती मिळते.”
लांडे यांच्या शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. साळींदराचा मोठा त्रास आहे. त्यावर उपाय म्हणून संपूर्ण शेतीला तारेचे कुंपण करून झटका तंत्रज्ञान वापरले आहे. नवनवीन वाणं वापरून तसेच बहुविध पीक पद्धती वापरून ते प्रयोग करत असतात. पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. अनेक शेतकरीही येथे भेट देतात.
श्रीकृष्ण लांडे ९९६०२७८५२७
अॅग्रोवन २०.८.२४