कामानंतर विश्रांती आणि मनोरंजन आवश्यक

22 Nov 2024 12:17:03
 
 प्रख्यात मतंग ऋषींना पशु-पक्ष्यांची विशेष    आवड होती. ध्यान, विद्यादान आणि पूजा झाल्यानंतर ते पक्ष्यांबरोबर खेळायचे. त्यांनी खूण केली की उडणारे पक्षी जमिनीवर उतरायचे, त्यांच्या अंगा-खांद्यावर बसायचे. अशाप्रकारे पक्षी आणि ऋषी सगळेच आनंदात असायचे.
एकदा ते असेच खेळण्यात रमलेले असताना अनंग ऋषी तिथे आले. ते मतंग ऋषींना म्हणाले, 'मुनिश्रेष्ठ, आपण महान  तपस्वी, ज्ञानी आहात ! असं लहान  मुलांसारखे चिमण्यांबरोबर कसे काय खेळताय? यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही का? तुमच्या साधनेत अडथळा येत नाही का?'
मतंग ऋषी हसले, त्यांनी आपल्या एका शिष्याला धनुष्यबाण घेऊन बोलावले. त्याने ते आणून दिल्यावर त्यांनी त्या धनुष्याची दोरी (प्रत्यंचा) सैल केली आणि ते खाली ठेवले. अनंग ऋषींना त्याचा अर्थ समजला नाही. त्यावर मतंग ऋषी म्हणाले. “मुनिवर, आपले मन या धनुष्यासारखे आहे. प्रत्यंचा नेहमी ताणलेली असली की कधीतरी ताण असह्य होऊन तुटते. आवश्यक असेल तेव्हा ती ताणली तर                उपयोग होतो आणि अपेक्षित परिणाम होतो.  असंच आपलं मनही आहे. काम एकाग्रतेने करा. काम झाले की पुरेसा आराम करा, मनोरंजनात सहभागी व्हा. सतत तणावाखाली असलात तर एकाग्रता कमी होते. विश्रांती आणि विनोदामुळे मनाला प्रेरणा मिळते. ते दीर्घकाळ स्वस्थ राहते.'
हे उत्तर ऐकल्यावर हात जोडून अनंग ऋषी म्हणाले, “महर्षी, यामुळेच आपण अनेक क्षेत्रात यशस्वीपणे संचार करीत आहात.”  

पांचजन्य २५.८.२४

Powered By Sangraha 9.0