शब्दांचे शुद्धीकरण

SV    27-Nov-2024
Total Views |
 
 “सनातन धर्माला प्राचीन परंपरा आहे. मोगल शासक भारतात इस्लामचा प्रसार करण्यासाठी आले होते. त्यांनी हिंदुंची संस्कृती, भाषा , धर्म, परंपरा नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळे आपले सण, उत्सव, धार्मिक परंपरामध्ये अरबी, फारसी,उर्दू शब्द आले. नंतर आले इंग्रज आक्रमक. त्यामुळे ते शब्द कायम राहिले. आता आपण ते बदलले पाहिजेत. त्यामुळे हिंदू धर्माचा, समाजाचा गौरव वाढेल” असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.      
'शाही' आणि 'पेशवाई' हे गुलामीचे प्रतिक असणारे शब्द मोगल शासकांनी रूढ केले. आपले आराध्य दैवत आणि ध्वजासह जे स्नान केले जाते त्याला सध्या 'शाही स्नान ' म्हणतात. कुंभ म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा. आखाडे हे याचे प्रमुख वैशिष्ट्य. कुंभमेळ्यात अतिशय उत्साहात विविध आखाड्यांच्या रथासह भव्य शोभायात्रा  येतात. त्यांना सध्या 'पेशवाई' म्हणतात.  या यात्रा म्हणजे  हरिद्वार इथे गंगामाता, उज्जैनला क्षिप्रा नदी किंवा नाशिकला त्र्यंबकेश्वरासमोर 'नतमस्तक  होणे' असा अर्थ आहे. गेली अनेक वर्षे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यासाठी येतात.
जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज इथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या वेळी 'शाही स्नान' किंवा 'पेशवाई' हे शब्द न वापरता 'राजसी स्नान' आणि 'कुंभ नगर प्रवेश' हे शब्द वापरावेत असे प्रयत्न सुरू आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषद आणि  अखिल भारतीय संत समिती मिळून यावर चर्चा सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये आखाडा परिषदेची प्रयागराज इथे बैठक होईल, त्यात सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी असतील. तिथे पर्यायी शब्द मंजूर झाले की मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना तसे कळवण्यात येईल. कुंभमेळ्यात लावली जाणारी पोस्टर्स, बॅनर्स यावर उर्दू, फारसी, अरबी शब्दांऐवजी हिंदी,संस्कृत आणि  पर्यायच नसल्यास इंग्रजी शब्द वापरावेत असा आग्रह आहे.   पांचजन्य २४.९.२४