हीच वेळ आहे जगभरातील मुस्लिमांनी एकजूट दाखविण्याची

SV    28-Nov-2024
Total Views |
 
एखाद्या विषयाचा मुस्लिम विचारवंत कसा विचार करतात हे वाचकांना समजावे म्हणून सांस्कृतिक वार्तापत्राच्या अंकात उर्दू वृत्तपत्राच्या आधारे मुस्लिम मनाचा कानोसा हे सदर दिले जाते. या सदरातील विचार हे सांस्कृतिक वार्तापत्राचे विचार नसतात;  हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 


आजकाल जेव्हा आपल्यातील कुणी मार खातो तेव्हाच जगभरातील मुसलमानांना एकजूट करण्याची  गरज वाटते. जेव्हा परिस्थिती निवळते तेव्हा पुन्हा आपल्यातील भांडणे डोके वर काढतात. भारतातदेखील हेच चित्र आहे, जेव्हा मोठ्या दंगली झाल्या तेव्हा मुसलमानांनी एकजूट दाखविली. मुंबईमधील भीषण दंगलीनंतर ऑल इंडिया उलेमा कौन्सिलची स्थापना याच एकजूटीतून  झाली होती. अखिल भारतीय स्तरावरही मुसलमानांची एकजूट दिसावी अशी हाक अधून-मधून दिली जाते, खासकरून शरीयतमध्ये कोर्ट किंवा सरकारकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा एकजूट दाखविण्याची गरज भासते. भारताच्या वेगवेगळ्या भागात मुसलमानांनी संकटाच्या काळात अभूतपूर्व एकजूट अनेकदा दाखविली आहे हेही तितकेच खरे आहे. परंतु ही एकजूट दीर्घकाळ टिकत नाही, परिस्थिती सामान्य झाली की मुसलमान पुन्हा आपापल्या पंथाचा झेंडा घेऊन एक-दुसऱ्याशी भांडताना दिसतो. पंथीय अस्मितेमुळे एकजूट होण्यास बाधा येत असेल तर सगळ्या मुसलमानांनी मुद्यांच्या आधारे एक होण्याचा विचार करावा. नाही तर वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करावा लागतो.
जे भारतीय मुसलमानांच्या बाबतीत चित्र दिसते तेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समाजाला लागू होते. मुस्लिम देशांच्या सीमारेषा या पंथ, इस्लामी फिरके याच्या आधारे विभागल्या गेल्या आहेत. परंतु आज इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या झळा शेजारी मुस्लिम देशांपर्यंत पोहोचल्या तेव्हा कुठे मुसलमानांना एक होण्याची गरज भासली आहे. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खोमेनी यांनी जुम्म्याच्या आपल्या भाषणात पश्चिमेतील देशातून इस्लामविरोधी गट कसे षडयंत्र रचतात याची माहिती दिली. अफगाणिस्थान, इराण, लेबनॉन, पॅलेस्टाईन यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मुसलमानांनी एक होण्याचे आवाहन केले. जर इस्राईल आणि अमेरिकेच्या दादागिरीच्या विरोधात मुस्लिम देश एक झाले नाहीत तर गाझाप्रमाणे लेबनॉन, सिरीया आणि येमेन या देशांनादेखील बेचिराख केले जाईल. मुस्लिम देश एक झाले नाही तर इस्रायल एक-एक करत मुस्लिम देशांना पोखरेल. हमास, हिजबुल्लाह, इराण यांनीदेखील इस्रायलला कमी लेखू नये. त्यांच्यामागे अमेरिका, ब्रिटन आणि अन्य पाश्चिमात्य देश आहेत. जगभरात यहुदी लोकांची लोकसंख्या केवळ २-३% आहे परंतु जगभरातील अर्थव्यवस्थेत त्यांचा मोठा वाटा आहे. आपण बाजारातून विकत घेत असलेल्या  अनेक वस्तूच्या निर्मितीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष गुंतवणूक इस्रायली नागरिकांची आहे. “बाजारात इस्रायली गुंतवणूक असलेल्या वस्तू विकत घेऊ नका, बॉयकॉट करा” असे आवाहन कित्येकदा करून झाले परंतु त्याचे पालन झाले नाही.
इस्रायलने इराणमध्ये घुसून हमासच्या प्रमुखाला ठार केले, हिजबुल्लाहच्या प्रमुखाला जमिनीच्या आत ५० मीटरवर असलेल्या बंकरमध्ये ठार केले; या अत्याधुनिक इस्राईली तंत्रज्ञानाचा आपण सामना कसा करणार? अर्थात इराणची सैनिकी ताकद अधिक आहे, तो इस्रायलच्या प्रत्येक हल्याला जशास तसे उत्तर देत आहे कारण अल्लाहची अदृश्य शक्तिदेखील त्याच्याबरोबर आहे. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खोमेनी यांनी इस्लामी देशांना एकजूट दाखविण्याचे जे आवाहन केले आहे त्यामुळे पश्चिमेतील मुस्लिमविरोधी शक्तींना आपली ताकद दाखविण्याची चांगली संधी आहे परंतु असे होणार नाही कारण प्रत्येक मुस्लिम देशाची काहीतरी कमजोरी आणि अडचण आहे. सर्व अरबी देशसुद्धा गप्प आहेत त्यामुळे इतर मुस्लिम देश कणखर भूमिका घ्यायला धजावत नाहीत. खरे तर हीच संधी आहे अमेरिकेला लायकी दाखविण्याची ! नाहीतर अमेरिका एक-एक करीत सर्व इस्लामी देशांची राखरांगोळी करेल. तुर्कस्थानने घेतलेली अलिप्ततावादाची भूमिकादेखील संभ्रमात टाकणारी आहे कारण २-४ वर्षांपूर्वी तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष जगभरातील इस्लामी देशांच्या एकजुटीची भाषा करीत होते आणि त्याचे नेतृत्व करायला तयार होते परंतु पॅलेस्टाईनच्या लढयाबद्दल ते गप्प आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी या वादात उडी घेतली तर नक्कीच पॅलेस्टाईनचा लढा मजबूत होईल. कारण यहुदी त्यांच्या विजयानंतर जेरुसलेममधील अल-अक्सा मशिद पाडून टाकतील आणि त्या जागी हेकल-ए-सुलेमानी (यहुदी प्रार्थनास्थळ)ची उभारणी करतील. त्यामुळे ही लढाई केवळ इस्रायलविरुद्ध हमास, हिजबुल्लाह, इराण अशी नसून संपूर्ण इस्लामी देशांची ताकद, कुवत आणि नियत तपासण्याची देखील आहे.
जर या घडीला हमास, हेजबुल्लाह आणि इराणला इतर मुस्लिम देशांनी साथ दिली नाही तर इस्रायल आणि अमेरिकेने इस्लामी देशांच्या अस्तासाठी जी योजना आखली आहे ती यशस्वी होईल आणि त्याची सुरुवात अरब देशांमधूनच होईल. अशी योजना जर अमेरिकेने लागू केली तर अफगाणिस्थान इस्लामी जगाचे नेतृत्व करेल आणि अमेरिकेला जशास तसे उत्तर देईल परंतु त्यासाठी  इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खोमेनी यांचे आवाहन सर्वांनी गंभीरपणे घेतले पाहिजे आणि इस्रायलविरोधात एकजूट केली पाहिजे. तसे झाल्यास इस्रायलचा अंत व्हायला वेळ लागणार नाही, नाहीतर इस्रायल-अमेरिकेने लावलेल्या आगीत एक एक करत सर्वांचीच घरं जळून खाक होतील.
- फारूक अंसारी
(उर्दू टाईम्स, ०५ ऑक्टोबर २०२४)