समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या ऐतिहासिक रामसेतूचा पहिला सर्वसमावेशक नकाशा तयार करण्याची किमया 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी करून दाखविली आहे. यासाठी त्यांनी प्रगत लेझर तंत्रज्ञान आणि 'नासा'च्या आयसीई सेंट-२ या सॅटेलाइटची मदत घेतली. अशा प्रकारचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा नकाशा आहे.
रामसेतूबाबत 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन 'सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नल'मध्ये प्रकाशित झाले आहे. 'इस्रो'च्या जोधपूर आणि हैदराबाद नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांकडे या शोधनिबंधाचे श्रेय जाते. त्यांनी संशोधनात म्हटले आहे की, 'आम्ही, 'नासा'च्या उपग्रहाची मदत घेऊन रामसेतूचा पहिला तपशीलवार नकाशा तयार केला आहे. रामसेतूचा ९९.९८ टक्के भाग अत्यंत उथळ पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे या सेतूचे जहाजाद्वारे किंवा प्रत्यक्ष पाण्यात उतरून सर्वेक्षण करणे शक्य नाही. यास्तव उपग्रहाची मदत घेण्यात आलेली आहे. शास्त्रज्ञ गिरीबाबू दंडबथुला यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले.
रामसेतू हा भारतातील रामेश्वरम दक्षिण-पूर्वेकडील श्रीलंकेतील मन्नार टोकापर्यंत धनुषकोडीपासून बेटाच्या उत्तर-पश्चिम तलाईमन्नारपर्यंत पसरलेला आहे. हा प्राचीन सेतू भारतातील धनुषकोडीला श्रीलंकेतील तलाईमन्नार बेटाशी जोडतो. रामायणात या पुलाचा उल्लेख आढळल्याने रामसेतूला सांस्कृतिक महत्त्व आहे.
रामाच्या वानरसेनेने लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर केला होता. नवव्या शतकापर्यंत पर्शियन लोक या पुलाला 'सेतू बंधाई' असे संबोधत होते. रामेश्वरम- मधील मंदिराच्या नोंदीनुसार, १४८० पर्यंत हा पूल समुद्रसपाटीपासून उंचीवर होता. परंतु नंतरच्या काळात आलेल्या वादळात या पुलाचे नुकसान झाले.
दहा मीटर रिझोल्यूशनचा नकाशा : शास्त्रज्ञांनी २०१८ (ऑक्टोबर) ते २०२३ (ऑक्टोबर) पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलाच्या तळाशी असलेल्या सेतूच्या संपूर्ण लांबीचा १० मीटर रिझोल्यूशनचा नकाशा तयार केला आहे. या नकाशानुसार, २९ किलोमीटर लांबीच्या रामसेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर आहे.
पुढारी २०.७.२४