सोमवार, १५ सप्टेंबर १९४१. भारतीय सेनादलाच्या 'शीख रेजिमेंट'मध्ये करमसिंह नावाचा जवान भरती झाला. त्याने आपला वाढदिवस सेना दलात भरती होत जगावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्याचवेळी दुसरे जागतिक महायुद्ध पेटले होते. ब्रह्मदेशच्या दिशेने जपानी सैन्य भारतावर चालून येत होते. त्याला भारतात घुसण्यापूर्वी रोखण्यासाठी शीख रेजिमेंटला तिथे पाठवण्यात आले. करमसिंह त्यातच होता. त्या युद्धात त्याने कमालीचे शौर्य गाजवले, तो अतिशय निष्ठेने लढला. त्याचा पराक्रम पाहून ब्रिटिश सरकारकडून त्याला त्या काळातले 'मिलिटरी मेडल' मोठ्या सन्मानाने बहाल करण्यात आले.
दुसरे महायुद्ध संपले. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पाकिस्तानने आधी घुसखोरांमार्फत आणि नंतर सैन्यदलाद्वारे भारतावर हल्ला चढवला. त्यांनी काश्मीर घाटीतील भारतीय चौक्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यापैकी टीथवाल मधील रिचमर गल्लीचा परिसर ताब्यात घेण्यासाठी पाक सैनिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने युद्धात उतरले होते. त्यांचा बिमोड करण्याची जबाबदारी 'शीख बटालियन'वर सोपवण्यात आली. तेरा तारखेला 'ईद'च्या दिवशी पहाटे अंधारात पाकिस्तानने पहिली तोफ डागली. करमसिंह आपल्या जवानांसह सावध होते. त्यांनी कडवा प्रतिकार केला. सकाळी साडेनऊ वाजता पाक सेनेने पुन्हा हल्ला केला.तो परतवण्यात आला मात्र भारताचे बरेचसे बंकर्स कोसळले, तुटले, निकामी झाले. या चकमकीत करमसिंहांना हवाई दलाची मोठी मदत झाली. भारताच्या लढाऊ विमानांनी पाक सेनेचे नापाक इरादे धुळीस मिळवले.
बुधवार १३ ऑक्टोबरची रात्र! मिट्ट काळोख! करमसिंह आणि त्यांचे साथीदार थकले होते. मध्यरात्री शत्रूने हल्ला चढवला. अंधार असल्याने भारतीय हवाई दल मदत करू शकत नव्हते. बंकरमध्ये सात जवान उरले होते. चकमकीत आणखी तीन जवान धारातीर्थी पडले. दारुगोळा संपला. दोन शत्रू सैनिक हँडग्रेनेड्स घेऊन बंकरमध्ये पोचले. करमसिंहानी कसलाही विचार न करता क्षणार्धात बंकरबाहेर उडी मारली. हातात रायफल, पराकोटीच्या त्वेषाने 'बोले सो निहाल, सत श्री अकाल’ अशी गगनभेदी गर्जना करत त्यांनी दोघांनाही भोसकले आणि परत बंकरमध्ये उतरले. सोळा गोळ्या झेलूनही एकटे करमसिंह जिवंत होते.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला गेला तेव्हा सलामी देण्यासाठी निवडलेल्या पाच सैनिकांमध्ये एक होते करमसिंह !
शिवामुद्रांकन पत्रिका, मे २०२४