अष्टावधानी शिवराय

SV    07-Nov-2024
Total Views |
 
 छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष. या निमित्ताने विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने २०२४ सालच्या वार्षिक विवेक शलाकेत १२ पानांवर शिवराज्याभिषेकाच्या विविध १२ पैलूंवर लिहिले आहे. या लेखांचे विस्तारित रूप म्हणजे 'अष्टावधानी शिवराय' हे पुस्तक. लेखक आहेत सोलापूर  तरुण भारतचे माजी संपादक अरुण करमरकर.
शिवाजी महाराजांच्या कार्याचा व्याप तसेच त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षांची झेप किती दूरवर जात होती याचे आकलन हे पुस्तक वाचून होईल. या पुस्तकात मातोश्री जिजाऊंनी दिलेल्या शिक्षणाचे वर्णन आहे, शहाजीराजांनी दिलेल्या बहादुरीच्या वारशाचे दाखले आहेत, शिवरायांच्या जिवलग सवंगड्यांच्या प्रेमाच्या, त्यागाच्या समर्पणाच्या गोष्टी आहे.
सामान्य माणसे आपले आयुष्य असे कोणासाठी कसे ओवाळून टाकतात, यामागे शिवरायांच्या विचारांचे, आचाराचे, त्यांनी ठेवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या उदात्त स्वप्नाचे बीज आहे. त्याचे दर्शन या पुस्तकात घडते. शिवरायांनी विजापूरच्या फत्तेखानाविरूद्ध वयाच्या अठराव्या वर्षी केलेली लढाई ही त्यांच्या आयुष्यातील स्वराज्यासाठी केलेली पहिली लढाई. त्याची यथायोग्य दखल पुस्तकात घेण्यात आली आहे. शिवरायांचे वैचारिक अधिष्ठान, त्यांना मिळालेला संत परंपरेचा वारसा, त्यांचे युद्धकौशल्य याचा उहापोह यात आहे. या पुस्तकात शिवरायांचे राजनैतिक विचार, राज्यव्यवस्था आणि प्रशासनव्यवस्था, त्यांनी केलेली आरमाराची बांधणी व युद्धतंत्र याचा सर्वंकष विचार वाचायला मिळतो.
स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “छत्रपती श्री शिवाजी महाराज हा जणू शुभंकर ईश्वराचा देहरूप अवतारच होता. म्लेंच्छांनी मांडलेल्या अधर्माच्या थैमानावर मात करून स्वधर्माची प्रतिरक्षा करण्यासाठी दंड थोपटून उभा राहिलेला तो एक सर्वश्रेष्ठ राजा होता. अस्सल देशभक्तीची जोपासना तर त्याने केलीच परंतु तत्कालीन भारतातील छोटी छोटी राज्ये संघटीत करून त्यांना अखंड भारतात विलीन करण्याचे स्वप्नही त्याने पाहिले.”
अशा महापुरुषाच्या अष्टपैलू जीवन-गुणांचा वेध घेणारा हा ग्रंथ युवा नेतृत्व विकसन शिबिरासाठी तरुणांची निवड करण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरेल.
१०४ पानांच्या या पुस्तकाचे मूल्य ५०/-रु.आहे. पुस्तक मिळण्याचे ठिकाण-
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग,
अश्विनी हाईटस्, २०१२/१६/१७ 'बी',
सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे, ३०.
दूरभाष-०२०-२४४३ २३४२