एका कोर्टातले न्यायाधीश मोठे धार्मिक आणि सत्प्रवृत्तीचे होते. पंढरीची वारी दर वर्षी न चुकता करत. एकदा त्यांच्या कोर्टात पोलिसांनी एक चोर आणून उभा केला. रंगेहाथ पकडला गेला असल्यामुळे त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. प्रथेप्रमाणे शिक्षा देण्याच्या आधी न्यायाधीश म्हणाले, ''गुन्हा तू कबूल केलाच आहेस. तरीसुद्धा शिक्षा सुनावण्याच्या आधी तुला अजून काही सांगायचे असेल तर सांग, कोर्ट ऐकण्यास तयार आहे.'' तेव्हा तो चोर मोठ्या गंभीरपणे म्हणाला, ''जज्जसाहेब, आतापर्यंत मी अनेक न्यायाधीशांसमोर उभा राहिलो आहे आणि त्यांनी मला शिक्षा पण केल्या आहेत; परंतु आज मला विशेष आनंद होत आहे. मी ऐकून आहे की, ''भगवंतावर आपली फार निष्ठा आहे. तेव्हा मला आपल्याला एवढेच सांगायचे आहे, की चोरी मी माझ्या इच्छेने केली नाही. पांडुरंगाने जशी प्रेरणा दिली तसा मी वागलो. त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली. तेव्हा आपण मला दोषी धरू नये.'' चोराचे बोलून ऐकून कोर्टातील लोक चाट पडले; परंतु न्यायाधीशदेखील पक्के होते. त्यांनी निकाल दिला की, ''चोराने म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे; पण ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करण्यास प्रेरणा दिली तोच पांडुरंग त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा मला देत आहे. म्हणून चोरी जशी ईश्वराच्या इच्छेने घडली, तशी त्याबद्दल शिक्षा ही देखील त्याच्याच इच्छेने दिली जात आहे. तुला एक वर्षभर सक्तमजुरी भोगायची शिक्षा ठोठावत आहे.''
बूमरँग म्हणजे आपण समोरच्यावर सोडलेले शस्त्र शत्रूचा वेध घेऊन परत आपल्याकडे येते. वेदांताचा खोटा आधार घेऊन शाब्दिक कसरती करता येतील पण त्यामुळे आपल्या वागण्याचे समर्थनही होत नाही व समाधानही मिळत नाही, 'देव खरोखर आहे' असे मानून वागणारे लोक फार थोडे !
अनमोल बोधकथा