नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील बरेली येथील जलदगती अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला बलात्काराच्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनी याप्रकरणी सुनावणी करताना या प्रकारास 'लव्ह जिहाद' म्हणून संबोधले आहे. मुस्लिम पुरुष पद्धतशीरपणे हिंदू महिलांशी प्रेमाचे नाटक करून विवाहाद्वारे इस्लाम धर्मात बदलण्यासाठी लक्ष्य करतात. लोकसंख्याशास्त्रीय युद्ध करण्यासाठी विशिष्ट धर्माच्या काही अराजकतावादी घटकांकडून 'लव्ह जिहाद'चा वापर करण्यात येत आहे. भारतात पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करून भारतावर वर्चस्व प्राप्त करण्याचा हा कट असल्याचे दिसते, अशी अतिशय महत्त्वाची टिप्पणीदेखील त्यांनी केली आहे.
आरोपी मो. अलीमने आपले नाव आनंद (हिंदू) असे सांगून हिंदू रीतीरिवाजांनुसार पिडीतेशी लग्न केले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पिडीतेची छायाचित्रे आणि चित्रफिती बनवून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने यावेळी 'लव्ह जिहाद'ची व्याख्यादेखील केली आहे. न्यायालयाने म्हटले की, सोप्या शब्दांत 'लव्ह जिहाद' म्हणजे मुस्लीम पुरुषांनी गैर-मुस्लीम समुदायातील महिलांशी प्रेमाचे नाटक करून आणि त्यांच्याशी लग्न करून इस्लाममध्ये धर्मांतरित करणे. 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून बेकायदेशीर धर्मांतरे एखाद्या विशिष्ट धर्मातील काही अराजकतावादी घटकांकडून घडवून आणली जातात.'लव्ह जिहाद'साठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. त्यामुळे 'लव्ह जिहाद' मध्ये परकीय निधीची वस्तुस्थिती नाकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
केंद्र सरकारने 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून होणारे अवैध धर्मांतर वेळीच थांबवले नाही, तर भविष्यात देशाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. बेकायदेशीर धर्मांतरे ही देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी मोठा धोका आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की, 'लव्ह जिहाद' सारख्या प्रकारांतून बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने २०२१ पासून बेकायदेशीर धर्मांतर कायदा लागू केला आहे.
सकाळ, मुं.त.भा.३.१०.२४