बंगळूर : सध्याच्या २१ व्या शतकातही अशी काही मंदिरे आहेत जी आक्रमकांच्या तडाख्यातून वाचलेली आहेत. कर्नाटकात रायचूर जिल्ह्यामध्ये ९०० वर्षांपूर्वीचे श्री लक्ष्मी-व्यंकटेश मंदिर असेच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. या मंदिरातील श्री व्यंकटेशाच्या पाषाण मूर्तीवर रोज सकाळी गरम पाण्याने अभिषेक घातला जातो. असे म्हटले जाते की, हे उकळलेले पाणी ज्यावेळी मूर्तीच्या डोक्यावरील मुकुटावर ओतले जाते त्यावेळी ते पायापर्यंत येता येताच थंड होते.
सर्वसाधारणपणे एक लिटर पाणी १०० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केले तर ते थंड होण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो मात्र, या मूर्तीच्या डोक्यावर ओतलेले असे उष्ण पाणी पायापर्यंत येता-येताच थंड होते. याउलट जर डोक्यावर थंड पाणी ओतले तर ते पायापर्यंत येईपर्यंत उष्ण होते असेही सांगितले जाते.
मात्र, जर मूर्तीच्या बेंबी किंवा पायावर उष्ण किंवा थंड पाणी ओतले तर ते आहे त्याच स्वरुपात वाहून जाते. या मूर्तीच्या काळ्या पाषाणात किंवा मूर्तीमध्ये असे कोणते वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डोक्यावर ओतलेले उष्ण पाणी तत्काळ थंड होते, याबाबत भाविकांना नेहमीच कुतूहल वाटत असते.
पुढारी १८.१०.२४