साध्या शब्दात प्रबोधन

21 Dec 2024 10:08:04
 
 सामाजिक जाणीव ठेवून समाज प्रबोधनाचे काम संतांनी आयुष्यभर केले. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम, संत नामदेव, चोखामेळा, संत गोरा कुंभार, मुक्ताबाई,जनाबाई गाडगेबाबा यासारखे  अनेक मोठे संत होऊन गेले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतसाहित्याने महत्वाची भूमिका बजावलेली दिसते.
महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचे काम ज्या एका तेजस्वी ज्ञानसूर्याने केलं ते  म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. १३ व्या शतकात महाराष्ट्रात अज्ञान तसेच अंधश्रद्धेचे  राज्य होते. अशा परिस्थितीतून माणसाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ग्रंथ रचून सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली.
'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि मानावा' असे म्हणणारे संत तुकाराम हे संत चळवळीतील कळस बनले. ते म्हणत 'पोट भरण्यासाठी ढोंग करू  नका, कष्ट करायला शिका, या जगात कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. देवपुजेत गुंतून बसू नका, त्यात विनाकारण वेळ घालवू नका, कामात परमेश्वर शोधायला शिका 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' याचा अर्थ निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे रक्षण करा'. असं सांगणारे ते खरे पर्यावरणवादी होते.
संत नामदेवांनी आपल्या साहित्यातून जाती-भेदांवर हल्ला केला. तर बहुजन समाजासाठी भारुडामधून एकनाथ महाराजांनी आध्यात्मिक आणि प्रापंचिक दैववाद दाखवून दिला.
गोपाला, गोपाला असं म्हणत हातामध्ये खराटा, फुटलेलं मडकं घेऊन गाडगेबाबांनी गावातली घाण स्वच्छ केली आणि आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं तसेच गावातल्या लोकांची मनं निर्मळ करण्याचं काम त्यांनी केलं. गाडगेबाबांच्या काळात मुलाच्या जन्मावेळी मांसाहार करावा अशी प्रथा होती. या प्रथेला फाटा देऊन गाडगेबाबांनी मुलाच्या जन्माचे स्वागत गोडधोड करून करूया असा संदेश दिला.
पुढे १९ व्या शतकातील म. फुले, डॉ. आंबेडकर,   राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, आगरकर, राममोहन राय यासारख्या समाज-सुधारकांनी संतांचेच अपुरे कार्य पुढे सुरू ठेवले आणि ज्ञानाचा दिवा झोपडीपर्यंत नेऊन पोहचला.
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस, भरकटलेला दिसून येतो. आजही जातीभेद,उच्चनीच अंधश्रद्धा आपल्यात दिसून येतात. अशावेळी मनुष्याने संत साहित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाचं तत्वज्ञान समजून घेऊन जर वाटचाल केली तर त्याची दिशाभूल  होणार  नाही.
संत विचार  (website : knowledge.org.in
Powered By Sangraha 9.0