नागपूर- मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करणे आणि बफर क्षेत्रातील लोकांचे वन्यजीवांपासून संरक्षण करणे या उद्देशाने पेंच अभयारण्यातील बफर क्षेत्रात 'आभासी भिंत' (व्हर्चुअल वॉल) म्हणून ओळखली जाणारी वन्यजीव व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही भिंत म्हणजे इंटरनेटयुक्त क्षमतांसह स्मार्ट ए.आय. कॅमेऱ्यांची एक साखळी आहे. प्रणाली जंगल आणि गावाच्या सीमेवर एकमेकांशी जोडलेली आहे. यामुळे वाघांसह इतरही वन्यप्राण्यांचा मागोवा घेतला जाणार आहे
'व्हर्चुअल वॉल’मुळे वन्यप्राणी प्रकल्पांमध्ये होणारा प्रकल्पामधील मानवी हस्तक्षेप, शिकाऱ्यांची अवैध घुसखोरी रोखता येणार आहे. या यंत्रणेमुळे विशिष्ट क्षेत्रातील तृणभक्षी प्राण्यांची घनता ओळखण्यास मदत होणार आहे. याशिवाय, विशिष्ट वाघ शोधण्यास, तो शेवटचा कुठे दिसला होता, त्याच्या आसपास असणाऱ्या इतर वाघांचा मागोवा घेण्यासही ही यंत्रणा सक्षम आहे. या यंत्रणेमुळे मानवी वस्तीजवळ वाघ दिसल्यास वन अधिकाऱ्यांना ईमेल आणि संदेशाच्या स्वरूपात अलर्ट मिळेल. यासाठी लागणाऱ्या इंटरनेटच्या वेगासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे चांगले इंटरनेट नेटवर्क नसलेल्या भागातही डेटा हस्तांतर करता येईल. अतिशय कमी वेळात या कॅमेऱ्यात प्रतिमा टिपता येणार आहे. ही प्रणाली सौर पॅनेलचा वापर करून ऊर्जा निर्मिती करते.
'व्हर्चुअल वॉल सिस्टीम'चा उद्देश ‘वास्तविक वेळ निरीक्षण प्रणाली’ तयार करून मानव-वाघ संघर्ष कमी करणे आहे. या प्रणालीमुळे वाघ आणि इतर हिंस्र प्राण्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवता येणार आहे.
'आभासी भिंती'मध्ये नवीन काय?
पेंच प्रकल्प प्रशासनाने हे कॅमेरे विशेष पद्धतीने तयार करून घेतले आहे. ते कॅमेरे फक्त एकाच जागी स्थिर राहणार नाहीत तर हलवता येण्याजोगे आहेत. ज्या भागात मानव प्राणी संघर्षाच्या घटना अधिक आहेत, तेथे त्यांचा वापर करता येईल. यामुळे कॅमेऱ्याची साखळी कायमस्वरूपी ठेवण्याची गरज भासणार नाही.
- डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, सकाळ २६.८.२४