रूखनखेडा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील अजय पाटील यांनी अनेक वर्षांपासून काबुली हरभऱ्याची शेती टिकवली आहे. कृषी पदवीधर असल्याने त्यातील शास्त्रीय ज्ञान, अनुभव व अभ्यासाची जोड देत या पिकात त्यांनी दर्जेदार उत्पादनात हातखंडा तयार केला आहे. जळगाव जिल्हा हरभरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तापी, गिरणा व अनेर नदीकाठच्या गावांमधून प्रामुख्याने हरभरा घेण्यात येतो. कापूस, केळीप्रमाणे हरभऱ्याची थेट शेतातून खरेदी व्यापारी करतात. चांगले अर्थकारण देणारे रब्बीतील पीक या दृष्टीने शेतकरी त्याकडे पाहतात. अजय पाटील यांची १८ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. गूळ नदीचा लाभ होतो. मृग व कदिबाग या दोन हंगामात केळी लागवड, खरिपासह रब्बीत कलिंगड व खरिपात कांदा अशी त्यांची पीक पद्धती आहे. जमीन सुपीकतेवर भर असतो. एक देशी गाय आहे. शेण- गोमूत्राचा शेतीत उपयोग केला जातो.
हरभरा पिकातील तंत्र : अनेकदा कलिंगड घेऊन किंवा काहीवेळेस कापूस पिकाखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्या जागेतही हरभरा घेण्यात येतो. काहीवेळेस मनुष्यचलित यंत्राद्वारेही पेरणी होते. पेरणीच्या वेळेस एक गोणी संयुक्त खत, फुटवा तसेच फुले व दाणे पक्व होण्याच्या स्थितीत विद्राव्य खतांचा वापर ठिबकमधून होतो. हवामान पाहून कीडनाशकांची सुमारे दोन ते तीन वेळा फवारणी होते. सर्व बाबी मिळून एकरी सुमारे २२ ते २५ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. काबुलीमध्ये लहान आकारही उपलब्ध असतो. या पिकातील श्रम, खर्च तुलनेने कमी आहे. वाढ, उंची व फळ-फांद्यांची संख्याही मोठी असते. त्याचे काड टणक असते. त्याचा उपयोग पशुधनास सकस चारा म्हणून केला जातो
जळगावातील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा येथील बाजारात काबुली हरभऱ्यास मोठा उठाव असतो. शिरपुरात प्रामुख्याने जागेवर विक्री शेतकरी करतात. मध्य प्रदेशातील इंदूर तसेच गुजरातमधील सुरतलाही शिरपूर येथून जाणे सुकर आहे. त्यामुळे येथील व्यापारी शिरपूरमधील अडतदारांकडून काबुली हरभऱ्याची खरेदी करतात. येथून उत्तर भारतासह गुजरात, राजस्थान आदी भागात हरभऱ्याची पाठवणूक होते.
अजय पाटील ९५२९८१५८०८
९.१०.२४ अॅग्रोवन