दक्षिण भारतातील महापुरुष रामलिंगमस्वामी यांच्याकडे एकदा चार व्यापारी आले. ते म्हणाले, “आम्ही एक यज्ञ करणार आहोत. आपणास विनंती आहे, त्यात पहिली आहुती आपल्या हातांनी अर्पण करावी” स्वामी हसून म्हणाले, “नक्की. उद्या यज्ञासाठी लागणारे उत्तम प्रतीचे साहित्य घेऊन या. मी तुम्हाला साक्षात देवदर्शन घडवेन.” त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी यज्ञासाठी तूप,दूध, साखर आणि जेवणासाठी धान्य, भाज्या इत्यादी साहित्य घेऊन ते व्यापारी पोचले. त्यातून स्वामीजींनी शिरा, खीर, पुरी, भाजी असे रुचकर पदार्थ बनवून घेतले. नंतर आपल्या शिष्यांकरवी आसपासच्या गोरगरीबांना बोलवून आणले आणि जेवायला बसवले. स्वामीजी त्या व्यापाऱ्यांना म्हणाले, “या लोकांना आदराने आणि प्रेमाने जेवायला वाढा. तुम्ही यज्ञात आहुती देत आहात असे समजा. ज्यांना एकवेळचे जेवणही मिळत नाही ते साक्षात देव असून अन्नग्रहण करीत आहेत असे समजा.” व्यापाऱ्यांनी खरोखर त्याप्रमाणे केले. त्यांना प्रसन्न आणि समाधान वाटले. जेवणारेही तृप्त झाले.
त्यानंतर स्वामीजी त्या व्यापाऱ्यांना म्हणाले, “तुम्ही जेव्हा भुकेल्या व्यक्तींना जेवू घालता तेव्हा तो तृप्त होतो. त्याच्या अंत:करणातला देव आपल्याला आशीर्वाद देतो.” अन्नदानाची ही शिकवण त्यांचे अनुयायी आजही पाळतात.
पांचजन्य ६.१०.२४