हिवाळा ऋतू जरी चांगला असला तरी या ऋतूत अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये लठ्ठपणा, सांधेदुखी, ब्राँकायटिस, सर्दी, ताप आणि विविध प्रकारच्या अॅलर्जी प्रामुख्याने आहेत. लहान मुले असोत की वृद्ध, सर्वांनाच या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जाणून घेऊ या आजारांबद्दल आणि त्यावरील उपचारांबद्दल
हे रोग का होतात?
थंडीच्या काळात जास्त काळ थंड तापमानात राहण्यासाठी आपल्या शरीराला आतून उबदार ठेवावे लागते. यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता खूप वेगाने नष्ट होऊ लागते आणि आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.
हिवाळ्यात होणारे ५ सामान्य आजार
लठ्ठपणा : आपल्याला हिवाळ्यात खूप भूक लागते, स्वाभाविकपणे भरपूर खाल्ले जाते तसेच, थंडीमुळे, आपल्याला एका जागी बसून रहावेसे वाटते आणि व्यायामदेखील करावासा वाटत नाही, यामुळे तयार होणाऱ्या कॅलरीज जळू शकत नाही आणि लठ्ठपणा येतो.
संधीवात : हिवाळ्यात एकाच जागी बसणे, तसेच थंड, दमट हवामान यामुळे शरीराच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि आपण अनेक प्रकारच्या कमतरतांना बळी पडतो. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता जी पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने उद्भवते आणि त्यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते.
ब्राँकायटिस : या आजारामध्ये आपल्या फुफ्फुसातील सर्वात लहान वायुमार्गामध्ये श्लेष्माची समस्या असते, ज्यामुळे सतत खोकला सुरू होतो. ही समस्या प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येते.
सर्दी आणि ताप : हा आजार हिवाळ्यातील एक सामान्य समस्या आहे, ज्यामध्ये नाक बंद होणे, शिंका येणे, शरीर आणि स्नायू दुखणे, नाकातून पाणी येणे किंवा खोकला ही आहे.
अॅलर्जी : हिवाळ्यात, प्रतिकूल वातावरणामुळे आपले शरीर अनेक प्रकारच्या अॅलर्जींना बळी पडते, जसे की त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, डोळे लाल होणे, डोळ्यात पाणी येणे आणि बोटे सुजणे
'या' मार्गांनी स्वतःचे रक्षण करा
· स्वतःला उबदार ठेवण्यासाठी घरातील हीटर, ब्लोअर किंवा यासारख्या गोष्टीनी शरीर उबदार ठेवावे.
· थोडा सूर्यप्रकाश घ्यावा.
· आले, तुळस आणि गवती चहा, सुंठ याचा काढा करून प्यावा.
· लिंबू, शिकंजी, भाज्यांचे सूप इत्यादींनी स्वतःला सजलित (हायड्रेटेड) ठेवावे आणि हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
सौजन्य : एबीपी माझा, १०.१२.२३