रामराज्य व समर्थ

06 Feb 2024 10:20:22
 
 'राम' हा शब्द भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्णत्वाचा निदर्शक आहे. 'रामराज्य' या शब्दाचा आजही परिपूर्ण आदर्श राज्य अशा अर्थानेच वापर होत असतो. जेथे कर्तव्यासाठीं कर्तव्य व पावित्र्यासाठी पावित्र्य अशा धारणेचे व 'एकमेकां साह्य करू’ अशा व्यवहाराचे सर्वच्या सर्व लोक आहेत त्याला रामराज्य म्हणतात. साम्यवाद्यांनीही Withering away of the State या सूत्राने हीच कल्पना मांडलेली आहे. खरे म्हणजे त्यांनी ही भारतीय कल्पनेचीच अर्धवट उसनवारी केलेली आहे. असो. हे  रामराज्य भूतलावर निर्माण व्हावे हा समर्थांचा ध्येयवाद होता व ते भारतीय संस्कृतीच्या रक्षणानेच होणारें असल्यामुळे त्यासाठीच त्यांना धर्मराज्याची निर्मिती आवश्यक वाटत होती. आपली राम-राज्याची कल्पना मांडतांना श्रीसमर्थ म्हणतात :-
राम विश्राम देवांचा । रामभक्तांसि आश्रयो ।
रामयोगी मुनिध्यानी। राम रक्षी ऋषिकुळां ॥
कीर्ति या रघुनाथाची। पाहतां तुळणा नसे ।
येक बाणी येक वचनी। येक पत्नीच धार्मिकु ॥
राज्य या रघुनाथाचें। कळिकाळासि नातुडे
बहुवृष्टि अनावृष्टि। कदा न घडे जनीं ॥
उद्वेग पाहतां नाहीं। चिंतामात्र नसे जनीं ।
व्याधि नाहीं रोग नाहीं। लोक आरोग्य नांदती ॥
युद्ध नाहीच अयोध्या। राग ना मत्सरू नसे ।
बंद निर्बंधही नाहीं। दंड दोष कदा नसे ॥
कुरूपी पाहतां नाहीं। जरा मृत्यु असेचिना |
आदरू सकळे लोकां। सख्य प्रीति परस्परें ॥
बोलणें सत्य न्यायाचें। अन्याय सहसा नसे |
अनेक वर्तती काया। येक जीव परस्परें ॥
चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे |
संतोष समस्तै लोकां। रामराज्य भूमंडळी ॥

पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज
बाळशास्त्री हरदास


Powered By Sangraha 9.0