मौलवी, उलेमा, हाफ़िज़, मुफ्ती आणि इमाम यांची कामे काय असतात ?

15 Apr 2024 10:44:20
 
 मौलवी, आलिम, हाफिज, कारी, मुफ्ती, इमाम आणि काजी हे शब्द नेहमी कानावर पडतात.पण ते कोण असतात आणि त्यांची कामे काय असतात?
मौलवी : मदरश्यात शिक्षण घेतलेल्या लोकांना मौलवी किंवा मौलाना ही उपाधी दिली जाते. ही उपाधी बारावीच्या समकक्ष आहे. मौलवीचे काम धार्मिक शिक्षण देण्याचे असते.  
अलिम : अलिम म्हणजे ज्ञानवान. याचे बहुवचन  उलेमा होते. अलिमचे ही शिक्षण मदरश्यात झालेले असते. ते महाविद्यालयीन म्हणजे पदवीधर समकक्ष मानले अजते.
मुफ़्ती : मुफ्तीचा अर्थ आहे न्याय करणारा. मुफ्ती हा इस्लामी नियम व कायद्याचा जाणकार असल्याचे मानले जाते. तो धार्मिक बाबतीत आपले म्हणणे नोंदवतो. यांना धार्मिक बाबतीत फतवा काढण्याचा अधिकार असतो. हे धार्मिक मामल्यात न्याय निवडा करतात.
काजी : काजीचा अर्थ होतो न्याय देणारा किंवा न्यायाधीश. काजी हे शरीयत न्यायालयाचे प्रमुख असतात. मुस्लिम पद्धतीने झालेल्या निकाहचे (लग्नाचे) रजिस्ट्रेशन करुन ते कायदेशीर दर्जा देतात. काजी होण्यासाठी मुफ्ती होण्याबरोबर इस्लामी न्यायशास्त्राचा अभ्यास असणे ही आवश्यक असते. निकाह लावण्यासाठी काजीची गरज नसते.  तो  मौलवी, अलिम किंवा हाफिज लावू शकतो.  
हाफिज :  हाफिज म्हणजे एखादी गोष्ट पाठ असणे. हाफिज अशा व्यक्तीला म्हणतात ज्याला संपूर्ण कुराण मुखोग्दत असते. मुखोग्दत असण्याबरोबर त्याचा अर्थही माहित असला पाहिजे अशी आवश्यकता नसते. हाफिजचे विशेष काम हे रमजान महिन्यात कुराण ऐकवणे हे असते; ज्याला तरावीहची नमाज म्हणतात.  
कारी : कारी हे हाफिजचे अधिक शुद्ध स्वरूप मानले जाते. हाफिज झाल्यानंतर कुराणचे शुद्ध उच्चारण आणि लयबद्ध पद्धतीने वाचणाऱ्या व्यक्तीला कारी म्हणतात.
इमाम : इमामचा अर्थ होतो नेतृत्व करणारा, योग्य मार्गदर्शन करणारा. जो मशिदीत पाच वेळा नमाज पढतो. मशिदीत नमाज सामूहिक पढली जाते, त्यावेळी एकजण नमाज पढतो व बाकी नमाजी त्याचा मागे  उभे असतात.   इमाम असण्यासाठी विशेष अट नाही फक्त तो त्या सर्वजणात धार्मिक बाबतीत चांगला, संस्कारी, व्रतस्थ, ज्ञानी असणे आवश्यक असते.
झी सलाम  २३.२.२४

 

Powered By Sangraha 9.0