वयाच्या सोळाव्या वर्षी सावरकरांनी रचलेल्या चाफेकर नि रानडे या फटक्यात "शतावधी जे जन्मा येती मरोनि जाती ना गणती । देशासाठी मरती त्यासी देशपिते की बुध म्हणती ।।'' असे ते म्हणतात. “त्वकार्य नैतिक सुसंमत सर्व देवा । तत्सेवनीच गमली रघुवीरसेवा ॥ असे 'माझे मृत्युपत्र’ या कवितेत त्यांनी लिहिले होते. देवऋण, पितृऋण, ऋषिऋण फेडण्याची भावना त्यांच्या ‘मरणोन्मुख शय्येवर’ ह्या कवितेत स्पष्ट झालेली आहे. पवित्र, उदात्त देशभक्ती व नम्र , कर्तव्य परायण, ऋण फेडण्याची भावना ह्यांचा संगम सावरकरांच्या ठिकाणी झालेला आहे. ह्यामुळे आपल्या देशसेवेचे पारितोषिक आपणास मिळाले नाही ह्याचे त्यांना दु:ख झाले नाही की आपली उपेक्षा झाली ह्याची त्यांना खंत वाटली नाही.
सावरकर विचारदर्शन
– डॉ. अरविंद गोडबोले