नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यात नागपूरपासून ४० किलोमीटरवर पार्डी देशमुख गाव आहे. गावातील भीमराव कडू यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे ३७ एकर शेती आहे.
सुरुवातीपासूनच प्रयोगशीलतेची आवड असलेल्या भीमरावांनी १९७१-७२ च्या सुमारास संत्रा लागवड केली. त्या वेळी चांगले उत्पादन घेत बैलगाड्यांमधून नेऊन येत विक्री केली. ५१ हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळाले. मग भीमरावांनी रोपवाटिका उभारून दर्जेदार रोपनिर्मिती सुरू केली.
फळबाग केंद्रित शेती
सध्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे २५ एकरांवर संत्रा बाग आहे. हुंडी पद्धत तसेच व्यापाऱ्यांना विक्री होतेच. शहरातील शेतकरी बाजारांमध्येही संत्र्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा मार्ग भीमराव यांना मिळाला आहे. शेतकरी कंपनीचेही मोठे सहकार्य लाभते. संत्र्याच्या जोडीला मोसंबी बागही विकसित केली आहे. नागपूरचा काटोल, कळमेश्वर, नरखेड हा भाग संत्रा पट्टा म्हणून ओळखला जातो. याच भागात त्यांनी दोन एकरांत कालीपत्ती चिकूची लागवड १५ वर्षांपूर्वी केली आहे.
चंद्रभागा जलाशयाजवळ पाच एकर शेती असून तेथे गहू, हरभरा यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात. यंदा तीन एकर क्षेत्रातून भरपूर उत्पादन मिळाले.
भीमरावांच्या शेतीची वैशिष्ट्ये
शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे असे भीमराव सांगतात. त्याच दृष्टीने शेतीची जडणघडण केली आहे. केवळ उत्पादन घेऊन व्यापाऱ्यांना माल न देता थेट ग्राहक विक्री व्यवस्था तयार केली आहे.
सध्या मजुरांची समस्या मोठी आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून ट्रॅक्टर व अन्य यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. भाडेतत्त्वावरही यांत्रिक काम करवून घेतले जाते. दोन ते तीन बोअरवेल्स, तीन विहिरी आहेत. नदी आणि चंद्रभागा जलाशयातून पाइपलाइन करून सिंचनाची शाश्वत सोय केली आहे. सुमारे २० एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. राष्ट्रीय संशोधन संस्था, अन्य शास्त्रज्ञ तसेच कृषी विभाग यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्यानेच शेतीची विकास करणे शक्य झाले. दरवर्षी १०० ते २०० च्या संख्येने शेतकरी त्यांच्या बागेला भेट देण्यासाठी येत असतात.
पुरस्कारांनी सन्मान
फळबागांचे यशस्वी व्यवस्थापन हातखंडा तयार केल्याने २००५ मध्ये 'उद्यानपंडित' पुरस्काराने भीमरावांना सन्मानित करण्यात आले. ही प्रयोगशीलता कायम राखल्याने २०२१ या वर्षातील 'कृषिभूषण' पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे.
अॅग्रोवन ३०/३/२४