अकोला जिल्ह्यात बाळापूर येथील किरणकुमार आनंदराव हुसे यांची कासारखेड (बाळापूर) शिवारात १० एकर बागायती शेती आहे. किरणकुमार यांनी शेतीत प्रयोगशीलता जोपासली आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या नवनवीन वाणांची निवड करून उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी हुसे सातत्याने प्रयत्नशील असतात.
शेतीत ताळेबंदाला मोठे महत्त्व आहे. शेतीत प्रगती करायची तर नोंदीवहीचे महत्त्व व त्यासंबंधीचे धडे किरणकुमार यांना वडील आनंदराव यांनी शिकवले. नियोजनबद्ध शेतीसाठी पंचक्रोशीत ते प्रसिद्ध होते. तेव्हापासून शेतीसह घरखर्चातील प्रत्येक जमा-खर्च मांडून ठेवण्याचा छंद किरणकुमार यांना २० ते २२ वर्षांपासून जडला आहे.
स्वतंत्र नोंदवह्या
कोणत्या पिकाला वाढीच्या कोणत्या अवस्थेत कोणते खत दिले? किडींच्या नियंत्रणासाठी काय फवारणी केली होती? त्यासाठी किती मजूर लागले, त्यावर खर्च किती झाला असा सगळा तपशील किरणकुमार यांच्या नोंदवहीत पाहायला मिळतो. शेतीकामांची आणि जमा- खर्चाची अशा स्वतंत्र नोंदवह्या त्यांनी तयार केल्या आहेत. शासकीय योजना, पीककर्ज, पीकविमा नोंद व संबंधित कागदपत्रे देखील व्यवस्थितपणे वर्षनिहाय व महिनानिहाय जोपासली आहेत. या सर्व नोंदी शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरणाऱ्या अशाच आहेत.
प्रयोगशील शेतीत जपलेली उत्पादकता
पीक उत्पादकतेत सातत्य ठेवण्याचा किरणकुमार यांचा प्रयत्न असतो. सोयाबीनचे दरवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटलचे उत्पादन ते घेतात. तूर, उडीद , गहू हरभरा, ज्वारी, पेरू, कांदा पिकांचेही उत्पादन ते घेतात.
मागील हंगामात त्यांनी एक एकरात मोहरी लागवड केली. त्याचे एकरी नऊ क्विंटल असे उल्लेखनीय उत्पादन त्यांनी घेतले. अलीकडेच त्यांनी एक एकरात काळ्या जिऱ्याचे चार क्विंटल उत्पादन घेतले. त्यांच्या या प्रयोगाची दखल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी घेतली. तसेच त्यांना या वर्षीचा रोटरी क्लबचा 'कृषी दीपस्तंभ' पुरस्कार जाहीर झाला आहे.
अॅग्रोवन १३.४.२४