जनजाती समाजातील अनेक संन्यासी महामंडलेश्वर झाले

SV    29-Jun-2024
Total Views |
 
 प्रभू श्रीराम आणि भगवान दत्तात्रय यांचे निस्सीम भक्त असलेले महेंद्रानंदगिरी महाराज यांना जुना आखाड्याने जगद्गुरु ही उपाधी प्रदान केली. महेंद्रानंदगिरी महाराज हे वंचित समाजातील आहेत, परंतु त्यांचा धर्माबाबत असलेला समर्पण भाव पाहून आखाड्याने त्यांना जगद्गुरुपद बहाल केले. महेंद्रानंदगिरी महाराज यांनी वंचित समाजातील लोकांना सनातन धर्माशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे.
वंचित समाजातील २०१८ मध्ये महामंडलेश्वर बनलेले कन्हैय्या प्रभुनंदगिरी महाराज म्हणतात की, धर्मगुरु बनल्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. जे त्यांच्याकडे हीन दृष्टीने पहात होते ते आता सन्मानाने पाहू लागले आहेत. काहीसे असेच विचार त्याच समाजातील कैलासानंदगिरी महाराज यांचेही आहेत. जुना आखाड्याने यांनाही महामंडलेश्वर बनवले आहे. जनजाती व वंचित समाजातील संन्यासी लोकांना महामंडलेश्वर बनवण्याच्या मोहिमेला जुना आखाड्याने आता अधिक गती दिलेली आहे.
आतापर्यंत ५२ जनजाती समाजातील संन्याशांना महामंडलेश्वर बनवण्यात आले आहे. समाजातील उपेक्षित व सरकारी सुविधांपासून वंचित असलेल्या समाजातील लोकांना आमिष दाखवून किंवा भीती दाखवून धर्मांतर केले जाते आहे. ज्या भागात अशा वंचित समाजातील लोकांची लोकसंख्या जास्त आहे, अशा ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. हे लक्षात आल्यावर जुना आखाड्याचे संन्यासी त्यांच्यात मिसळून, त्यांच्याबरोबर राहून त्यांना समाजाच्या मुख्य धर्म व संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या समाजातील प्रमुख व्यक्तीला धर्मगुरु बनवून धर्माचे नेतृत्व दिले जात आहे.      
मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये जनजाती तसेच वंचित समाजाची लोकसंख्या दाट आहे, त्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांना आखाड्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना धार्मिक चालीरिती व सनातन धर्माबाबत श्रद्धा आहे त्यांना २०२५ साली होणाऱ्या कुंभमेळ्यात महामंडलेश्वर उपाधी बहाल                करण्यात येणार आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशमधून पाच, छत्तीसगढमधून बारा, झारखंडमधून आठ, गुजरातमधून पंधरा व महाराष्ट्रातून बारा जणांची महामंडलेश्वरपदासाठी निवड करण्यात आली आहे.      
जुना आखाड्याने मागील दहा वर्षात वंचित समाजातील ५,१५० पेक्षा अधिक संन्याशांना सनातन धर्माशी जोडण्याचे काम केले आहे. त्यातील योग्य व्यक्तींची निवड करून त्यांना महामंडलेश्वर बनवले जाईल. जुना आखाड्याचे सभापती प्रमुख श्रीमहंत प्रेमगिरी महाराज म्हणतात की, कोणतेही पद हे त्याच्या जातीकडे पाहून दिले जात नाही तर त्याच्या योग्यतेकडे पाहून दिले जाते.                आणि म्हणूनच आखाड्याने जनजाती समाजातील योग्य            व्यक्तींची निवड करून त्यांना महामंडलेश्वर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.  
  जुना आखाड्यात महामंडलेश्वरपदासाठी संबंधित व्यक्तीला परीक्षा द्यावी लागते. त्या व्यक्तीला आखाड्याच्या एखाद्या आश्रमात राहून सनातन धर्माच्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. जर एखादी व्यक्ती निरक्षर असेल तर तिला साक्षर असलेले अन्य संन्यासी धर्मग्रंथांचे मर्म समजावून सांगतात. घर व कुटुंबापासून दूर राहून भक्ती आणि त्यागमय दिनचर्या त्यांना आत्मसात करावी लागते. पाच वर्षानंतर त्याने आपली योग्यता सिद्ध केली तरच त्या व्यक्तीला पद दिले जाते. एखाद्याने आधी पासूनच संन्यास स्वीकारलेला असेल तर दोन तीन वर्षात त्याला ते पद मिळते.  
जुना आखाड्याने एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये पट्टाभिषेक समारोह आयोजित केला होता. त्यात वंचित समाजातील संन्याशांचा महामंडलेश्वरपदाचा पट्टाभिषेक झाला. त्यात मंगलदास, प्रेमदास, हरिप्रसाद व मोहनदास बापू यांना महामंडलेश्वर बनवण्यात आले. त्यावेळी त्या समारोहात त्या समाजातील पाच हजार लोक सहभागी  झाले होते, ते सारे सनातन धर्माशी जोडले गेले होते.  

                                                      शरद द्विवेदी
                                                                                                        दै.जागरण २९.४.२०२४