अर्थतज्ज्ञ शिवाजी महाराज!

SV    17-Jul-2024
Total Views |
 
 शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्वातील  अद्वितीय सेनानी, अजेय योद्ध्याने त्यांच्यातील अन्य पैलूंना इतकं झाकोळून टाकलेलं आहे की ते शोधणं ही अतिशय किचकट गोष्ट आहे. याशिवाय स्वराज्याच्या आर्थिक- व्यापारी इतिहासाबद्दलची मूळ कागदपत्रे म्हणावी तशी पुढे आलेली नाहीत त्यामुळे राजांच्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात त्यांनी उभं केलेलं लाखाच्या जवळपासचं खडं सैन्य, शेकडो किल्ले, समुद्रावर सतत कार्यरत शंभरापेक्षा जास्त लढाऊ जहाजांचा ताफा याला पोसणारी राजांची अर्थव्यवस्था नेमकी कशी होती याचे फुटकळ, विखुरलेले उल्लेख आपल्याला मिळतात त्यावरून आपण काही ठोस अंदाज बांधू शकतो.
पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरच्या इंग्रजांनी सिद्दी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा चालवणारे फिरंगी गोलंदाज ब्रिटीश निशाणासह दिल्याचा वचपा काढण्यासाठी राजांनी तात्काळ राजापूरची ब्रिटीश वखार लुटून हेन्री रेविंग्टनसह सात ब्रिटीश अटक करून सोबत नेले. नंतर राजापूरला अण्णाजी पंडीत नावाचा सुभेदार नेमून त्याच्यामार्फत सुरुवातीला मिठाचा व्यापार आणि नंतर अरबी देशासोबत मोठा व्यापार सुरू केला. एकदा मिठाच्या वाहतुकीला गलबत दिले कि त्याला ओल येत राहते आणि त्या गलबताचा अन्य काही उपयोग उरत नाही असे उल्लेख इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये वरचेवर येतात.
अण्णाजी पंडिताने मक्का, बसरा( इराक) आणि काँगो येथे पाठवलेल्या व्यापारी जहाजातून त्याला इतका प्रचंड नफा झाला की त्याने या नफ्यातून अजून कितीतरी नवीन व्यापारी गलबते बांधायची सुरुवात केली असे उल्लेखही आढळतात .राजांच्या आरमाराच्या सुरुवातीच्या काळात एका छापेमारीच्या दरम्यान राजांच्या आरमाराने मालवणजवळ गोव्याच्या पोर्तुगीजांनी चौल (रेवदंडा) च्या पोर्तुगीजांकडे जाणारी सात गलबते धरून ती विजयदुर्गाच्या किल्ल्याकडे नेली आणि साती गलबते 'हस्तिदंत' घेऊन जात होती असा उल्लेख आहे!
आरमाराचा मूळ उद्देश स्वराज्याचे आर्थिक हितसंबंध मजबूत करणे आणि समुद्री व्यापाराला सुरक्षा कवच देऊन फिरंगी आरमाराचे वर्चस्व मोडून काढणे हा होता. जमिनीवर ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा नियम समुद्रात "ज्याचे गलबत त्याचा व्यापार" असा होतो. हे दोन्ही उद्देश राजांच्या आरमाराने अल्पावधीत साधले. एकतर इंग्लिश आणि पोर्तुगीजांची समुद्रावरील दादागिरी कमी झाली आणि युरोपियन लोकांची समुद्रावरील एकाधिकारशाही राजांनी संपवली. अरबी समुद्रात सर्वात जुनी नौसैनिक ताकद म्हणजे पोर्तुगीज त्यामुळे ते म्हणतील तो कायदा आणि नियम. समुद्रात व्यापारी जहाजे जाण्यासाठी जवळच्या पोर्तुगीज अधिकाऱ्याला शुल्क भरून 'कार्ताज' म्हणजे परवाना घेणं सर्वांना सक्तीचं होतं आणि असा परवाना नसलेली जहाजे पोर्तुगीज जप्त करायचे. पुढे नंतर स्वराज्याची आरमारी ताकद वाढायला लागल्यावर पोर्तुगीज दुर्बल झाले आणि हे परवाने बंद झाले.
अफझल वधाचा आनंद साजरा करण्यात वेळ न खर्च करता दुसऱ्याच दिवशी राजे पन्हाळा जिंकण्यासाठी रवाना झाले. राजापूर, मालवण, गोवा या बंदरातून येणारा व्यापारी माल पन्हाळा मार्गे घाटावर जात होता त्यामुळे ते एक अत्यंत महत्त्वाचं जकात ठाणं होतं, ज्याचा त्यांनी रास्त उपयोग करून घेतला. महाराजांनी केलेले हे अर्थकारण आजही आपल्याला प्रेरक ठरते.
- विनय जोशी