उद्योगवर्धिनी चंद्रिका चौहान

SV    08-Jul-2024
Total Views |
 
 १९९३ साली लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे मोठा भूकंप झाला व शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तेंव्हा चंद्रिका चौहान यांनी आपल्या १०-१२ मैत्रिणींसह एक सेवाकार्य हाती घेतले- सोलापुरातील सधन लोकांच्या वस्त्यात जाऊन पोळी, भाजी, चटणी असे अन्न गोळा करून ते भूकंपग्रस्त भागात नेऊन पोचवणे.
त्यांचे पती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  कार्यकर्ते आहेत. संसारिक जबाबदारीला हातभार लावण्यासाठी  चंद्रिका भाभीनी शिवणकाम सुरू केले. नंतर घराच्या आसपास असलेल्या झोपडपट्टीत महिलांना शिवणकाम शिकवले. गरज असलेल्या महिलांना  शिवणयंत्रे  घेऊन दिली.
२००३ साली ‘उद्योगवर्धिनी’ संस्था सुरू झाली. भाभींना तिचे पाठबळ मिळाले. महिलांना यातून कर्जे व अर्थसहाय्य मिळू लागले. यामार्फत  पिशव्या शिवणे, गोधडी शिवणे, गणवेश, कपडे शिवणे, लोणची, पापड, मसाले, चटण्या, भाकरी तयार करणे याचे प्रशिक्षण त्यांनी महिलांना दिले. तयार मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. शेकडो महिला  स्वावलंबी झाल्या. यापैकी अनेकजणींना घरात किंमत नव्हती. पण त्या कमवायला लागल्या, बँकेचे व्यवहार करू लागल्या, कर्जे फेडू लागल्यामुळे त्यांचा घरातल्या निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढला. यातल्या काहीजणी आता काहीशे रुपयांपासून काही कोटी रुपयापर्यंत  औद्योगिक उलाढाल  करतात. हजारो महिलांना उद्योग देणारी सोलापूरची ‘कडक भाकरी’ जगाच्या नकाशावर पोचली.
गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चंद्रिका भाभींच्या कामाचा आवाका पाहून त्यांना गोव्यात महिला सक्षमीकरणासाठी बोलावले. सहा महिने त्यांनी गोव्यातल्या महिलांना प्रसाद तयार करणे, कपडे शिवणे, काजू प्रक्रिया, कागदी पिशव्या तयार करणे याचे प्रशिक्षण दिले.
भाभींनी प्रशिक्षण दिलेल्या महिला आता स्वावलंबी झाल्या आहेत. कोविडकाळात माता-पिता गमावलेल्या १३ मुला-मुलींना भाभींनी आधार दिला. त्यांच्या राहण्याची, शिक्षणाची सोय केली असून विवाहापर्यंत मदत करण्याचा भाभींचा  निर्धार आहे. ‘मंगल दृष्टी भवन’ नावाने सुरु केलेल्या उपक्रमात सात महिलांना आश्रय दिला आहे.
सोलापुरात महिला सक्षमीकरणाच्या कामात चंद्रिका चौहान यांचे काम आदराने घेतले जाते. १७ हजारपेक्षा जास्त महिलांना निरनिराळ्या मार्गांनी स्वावलंबी बनवणाऱ्या चंद्रिका भाभींना गेल्या वर्षी सोलापूरचा वि.गु.शिवदारे पुरस्कार मिळाला. हा त्यांना मिळालेला  १५० वा पुरस्कार आहे.
एकता, मार्च २०२४