अहिल्याबाईंचे पत्रव्यवहारातील चातुर्य

12 Aug 2024 10:53:48
 
 इतिहासाच्या अभ्यासात हुकूमनामा, सनद, बातमीपत्रे, शस्त्रे, नाणी याबरोबरच महत्वाचा दस्तऐवज म्हणजे पत्रव्यवहार.  मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे. यातून आपल्या लक्षात येते की होळकरांची युद्धनीती, राज्यकारभार, व्यापार, लोकपालन अशा सर्वच गोष्टींचे संस्कार अहिल्याबाईंवर होते.  त्यांनी आयुष्यभर अतिशय समर्थपणे आणि दूरदृष्टी ठेवून राज्यकारभार केला.  
आपल्या सासऱ्यांच्या म्हणजेच मल्हाररावांच्या शिस्तीत तयार झालेल्या अहिल्याबाईंचे प्रशासकीय  युद्धनीतीबाबतचे शिक्षण अतिशय कडक शिस्तीत झाले होते, हे त्यांनी पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रातून दिसून येते.  त्या लिहितात, “ इंग्रजांनी उन्माद केला आहे. यासमयी श्रीमंतांनी  शिलेदारांचा व हुजुरातींचा भरणा पुष्कळ करावा. जागोजाग फौजा पाठवून द्यावी म्हणजे मागल्यास दहशत पडेल पुढे कोणी येऊ पावणार नाही. नवाब, भोसले सारे जमा होऊन इंग्रजांचे पारिपत्य करावे.” याशिवाय त्यांनाच लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात, “श्रीमंत राजधानीत सैन्य कमी बाळगतात. श्रीमंत फौजेची उपेक्षा करतात ही गोष्ट कामाची नाही. फौज चांगली २५ ते ३० हजाराजवळ असावी. चहूकडून गडबड उडली आहे. अशा समयी आपण सैन्यासह बळकट असावे.”
आपल्या सासऱ्यांचा व्यवहारातील चोखपणा, शब्दांमधील धार असे सर्वच गुण अहिल्याबाईंमध्ये             उतरले होते. बातम्या मिळवण्याची आहिल्याबाईंची व्यवस्था उत्तम होती. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र अंतस्थ यंत्रणा (हेर खाते)उभी केली होती.
राघोबादादा महेश्वरला यायला निघाले आहेत अशी बातमी मल्हारराव यांच्या विश्वासातले तुकोजी होळकर यांनी अहिल्याबाईंना कळवली. अहिल्याबाईंनी तुकोजींना पत्राने कळवले की, “ फौज तेथील कायम ठेवून तुम्ही जेवत असल्यास पाणी पिण्यासाठी आम्हापाशी यावे.” राघोबादादांनी राज्य बळकावयाच्या लालसेने इंदुरवर पन्नास हजार सैन्यासह आक्रमण केले. हे  राज्यावरचे मोठेच संकट होते. शत्रू कोणी परकीय नसून खुद्द पेशवे घराण्यातील मातब्बर असामी होती. अहिल्याबाईंनी सर्व सरदारांना पत्र लिहून  त्यांना आपल्या बाजूने करून घेतले.
माधवराव पेशव्यांना पत्र लिहून राघोबांच्या आक्रमणाची कल्पना दिली आणि त्यांच्याकडूनही पाठींबा मिळवला. निवडक ५०० महिलांना युद्धाचे प्रशिक्षण  देऊन स्त्री सैन्याचे पथक तयार केल. इतकी तयारी केल्यावर त्यानंतर त्यांनी  राघोबादादांना  पत्र लिहिले, “ तुम्ही एका स्त्रीविरुद्ध युद्धाला उभे आहात. या युद्धात मी हरले तर लोक मला काहीच म्हणणार नाहीत . मात्र तुम्ही हरलात तर एका स्त्रीकडून हरलात म्हणून तुम्हाला जगात तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही.”  अहिल्याबाईंच्या या चतुराईने लोभी राघोबादादा पेचात पडले आणि माघारी गेले. यावरून अहिल्याबाईंची राज्यकारभारातील आणि सैन्यावरील पकड कशी मजबूत होती याची कल्पना येते.
- सुनीता पेंढारकर  मुं. तरुण भारत ३१.५.२४


  
Powered By Sangraha 9.0