सेवावर्धिनी

14 Aug 2024 13:09:10
 
 सेवावर्धिनी ही एक स्वयंसेवी संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्यांना, सेवाकार्य करणाऱ्या संस्थांना सक्षम करण्यासाठी, व्यवस्थात्मक सहयोग देण्यासाठी पूरक संस्था म्हणून सेवावार्धिनी संस्थेचा जन्म झाला. शिक्षणापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत आणि पर्यावरणापासून ग्रामविकासापर्यंत विविध कामे करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो संस्थांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य करण्याचे काम संस्था करते.  बिब्बा तेल उत्पादन पद्धतीत केलेले बदल, त्यासाठी केलेले यंत्राचे उत्पादन आणि त्यातून रोजगारनिर्मिती, वनवासींसाठी मध गोळा करण्याचे प्रशिक्षण त्यातून रोजगारनिर्मिती, देशपातळीवर महापालिकेने विकसित केलेला पहिला 'सॅनिटरी नॅपकीन' विल्हेवाट प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, बायोडिझेल, बायोगॅस, बायोएनर्जी, जलदूत प्रकल्प, सौरग्राम प्रकल्प अशा अनेक विषयांमध्ये 'सेवावर्धिनी'ने केलेले काम उल्लेखनीय ठरले आहे
बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक बारव बांधल्या  व दुरुस्तही केल्या. यंदा त्यांची  ३०० वी जयंती  आहे. त्यानिमित्त  सेवावर्धिनी संस्थेने १०० बारवांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करुन त्यांचे लोकार्पण करण्याचा संकल्प  केला आहे. प्राचीन बारवा आधुनिक पाणीपुरवठा  योजनेशी जोडल्यास त्यांचा चांगला वापर होईल असा यामागे  विचार आहे.
अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पात  काम सुरू करताना सुरुवातीला वाढलेली झाडे-झुडुपे काढून जागा स्वच्छ केली जाते.कचरा, प्लास्टिक काढून भिंतीवर साचलेले शेवाळे लोखंडी तारेच्या सहाय्याने घासून भिंती स्वच्छ केल्या जातात व गाळ काढला जातो. या प्रक्रियेने बुजलेले झरे मोकळे होऊन पाणी वाहू लागते. त्याच पाण्याने विहिरीचा तळ स्वच्छ केला जातो. सगळा गाळ पुलीला लावलेल्या घमेल्यातून वर आणला जातो. फार यंत्रसामग्री न वापरता माणसांच्या श्रमानेच बारव स्वच्छ होते. नंतर तो गाळ स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दूर नेला जातो. झरे स्वच्छ झालेली बारव पाण्याने पूर्ण भरली की ते पाणी शुद्ध स्वरूप पिण्यास उपलब्ध होते. सर्व प्रकारच्या चाचण्या करून ही विहीर शंभर टक्के उपयोगात येते.
या प्रकल्पांतर्गत पहिल्यांदा जेजुरी येथील बंगाली बारवेचे काम संस्थेने केले.  तेथीलच जानाई कुंड आणि शिरूर तालुक्यातील वाघेश्वर बारवांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. इतर ठिकाणी काम सुरू आहे.    
- शैलेंद्र बोरकर
सकाळ १२.५.२४
Powered By Sangraha 9.0