ध्येयाचा मानदंड

17 Aug 2024 10:54:36
 
 ही एक लोककथा आहे. एक चिमणी आकाशात उडत होती. तिच्या डोक्यावर एक पांढरा ढग चमकत होता. चिमणीला वाटले आपण त्या ढगाला स्पर्श करून यावा. ढगाला शिवून येण हे तिनं आपलं लक्ष्य ठरवलं. अंगातील सामर्थ्य पणाला लावून त्याच्या दिशेने उडू लागली. तो ढग कधी एका दिशेला, तर कधी दुसऱ्या दिशेला सरकायचा. काही वेळेस स्वतःभोवती गरागरा फिरायचा. त्याच्या या हालचालींवर मात करीत चिमणी त्याच्याजवळ पोहचली. पण, गंमत म्हणजे त्याला स्पर्धा करण्याआधीच तो अचानक विरून गेला. एकदम अदृश्य झाला. तेथे काहीसुद्धा नाही पाहताच चिमणी स्वतःशीच म्हणाली, ''माझीच चूक झाली, ध्येय किंवा लक्ष्य गाठायचेच असेल, तर ते उत्तुंग  पर्वतशिखरांसारखे असावे, क्षणभंगूर ढगांसारखे नसावे.''
तात्पर्य : किरकोळ आणि क्षुल्लक गोष्टीना ध्येय म्हणत नाहीत. ध्येयाला नेहमी उच्चतेचा व उदात्ततेचा स्पर्श हवा. ते सहजासहजी प्राप्त न होणारे, पण अवाक्यातले असावे, उत्तम व उन्नत अशा ध्येयाने जीवनाला कृतार्थता व धन्यता लाभते. जीवनात जे सुख मानले गेले आहे, जे सहज साध्य आहे,' त्याची क्षणभंगूरता जाणावी. जाणिवेतच मुक्ती मिळवून देण्याची शक्ती आहे.
 अनमोल बोधकथा
Powered By Sangraha 9.0