सातारा जिल्ह्यातील कुरवली बु. (ता.फलटण) येथील प्रगतीशील, प्रयोगशील शेतकरी अशी सचिन सांगळे यांची ओळख आहे. घरी अत्यंत गरिबी, १९८५ मध्ये गावात दुष्काळ पडला. दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जाण्याची वेळ आली.
शेतीची वाटचाल : संघर्षातच दिवस काढत कुरवली येथे तीन एकर माळरान जमीन यांनी खरेदी केली. ही जमीन हलक्या प्रतीची, दगड-धोंड्यांनी युक्त होती. नीरा उजवा कालव्याजवळ काही गुंठे जागा घेऊन विहीर घेतली. तेथून चार किलोमीटरवरून पाइपलाइन करून पाण्याची सोय केली. त्या वेळी सात एकरांत २००८ मध्ये द्राक्ष बाग घेतली. प्रामाणिक कष्ट, अभ्यासूवृत्ती या बळावर बाग यशस्वी केली. त्यातून काही कर्जफेड केली.
द्राक्षशेतीत हातखंडा : संघर्ष व मेहनतीतून अनेक अडथळे पार करीत सचिन आज शेती विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहेत. द्राक्ष व डाळिंब ही त्यांची आजची मुख्य पिके आहेत. दोन्ही पिकांत अनेक वर्षाच्या अनुभवातून हातखंडा तयार केला आहे.सतरा एकरांतील द्राक्ष बागेत व्हाइट व कलर मिळून नानासाहेब पर्पल, कृष्णा, माणिक,चमन, रेड ग्लोब हे वाण आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने गोडी छाटणी होते. फळांचा 'सनबर्निंग' पासून बचाव करण्यासाठी बागेवर प्लास्टिक आच्छादनाचा वापर होतो. नाशिक येथून मजूर व्यवस्थापन होते.
डाळिंब व अन्य शेती : द्राक्षांप्रमाणेच डाळिंबाचीही आदर्श शेती आहे. डाळिंबातही झाडांवर नेटचा वापर होतो.
सचिन यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
१. शेतीतील उत्पन्नतूनच दोन कोटी लिटर व ९० लाख लिटर क्षमता अशी दोन शेततळी. पाऊस कमी झाल्यास विहिरीतील पाणी आणून शेततळी भरली जातात. उन्हाळ्यात या पाण्याचा मोठा फायदा होतो.
२. स्वयंचलीत ठिबक सिंचन
३. गांडूळ खत युनिट, नाडेप खड्डा पद्धती. शेतीतील पालापाचोळा कुजवून कंपोस्ट निर्मिती. सेंद्रिय स्लरी तयार करून त्याचा वापर.
४. यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर. ट्रॅक्टरचलित आवश्यक सर्व अवजारे.
५. अवकाळी पाऊस, तपमान यांच्यापासून फळपिकांचे नियंत्रण करण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर
६. सौरउर्जेवरील स्वयंचलित हवामान केंद्रही उभारले आहे.
७. कायमस्वरूपी २० कामगार
अॅग्रोवन २७.५.२४