'ऑपरेशन ब्लू स्टार' ची चाळीशी

24 Aug 2024 10:36:49
 
 पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बेअंतसिंग,  भारताचे माजी लष्करप्रमुख  जनरल अरुणकुमार वैद्य आणि हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' या लष्करी कारवाईस नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले या दहशतवाद्याला तेथून हुसकावून लावण्यासाठी आणि भाविकांसाठी हे मंदिर पुन्हा खुले करण्यासाठी १ जूनच्या पहाटेपासून लष्करी मोहीम सुरू करण्यात आली. लष्कराने हरमिंदरसाहिब या पवित्र गाभाऱ्यात प्रवेश केला आणि तेथे आश्रय घेतलेल्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्या कारवाईत भिंद्रनवालाही मारला गेला आणि पंजाबमधील खलिस्तानची चळवळ जवळपास संपुष्टात आली. या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' असे नाव देण्यात आले होते.
पंजाबमधील राज्यस्तरीय राजकारणात अकाली दलावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जर्नेलसिंग भिंद्रनवाले या व्यक्तीला उभे केले. भिंद्रनवाले यांनी शिखांसाठी स्वतंत्र देश खलिस्तानची मागणी केली आणि नंतर त्यांनी काँग्रेस सरकारलाही न जुमानता पंजाबात खलिस्तानसाठी हिंसक आंदोलन उभे केले. समाजात हिंदू आणि शीख अशी फूट पाडून हिंदुंचा नरसंहार सुरू झाला. या हिंसाचाराचा प्रसार फक्त पंजाबपुरता मर्यादित राहिला नाही तर तो देशात पसरला.   या फुटीरतावादी आंदोलनाला पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा आणि अर्थसाहाय्य मिळत होते. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' नंतर पंजाबातील दहशतवादी कृत्यांवर कठोर कारवाई   करण्यात आली आणि अखेरीस हे राज्य या फुटीरतावादी दहशतवादापासून मुक्त झाले.
खलिस्तानची चळवळ आता भारतात सक्रीय नसली तरी ती पूर्णपणे संपलेलीही  नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दोन खलिस्तानवादी नेते- अमृतपालसिंग आणि सरबजितसिंग खालसा हे अनुक्रमे खदूरसाहिब व फरीदकोट या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.  सरबजितसिंग हा इंदिरा गांधी यांचा मारेकरी बेअंतसिंग याचा मुलगा आहे.वास्तविक अमृतपालसिंग हा आसाममधील दिब्रुगड तुरुंगात आहे. त्याने तिथून ही निवडणूक लढवली आणि त्यात विजयीही झाला. पंजाबपासून हजारो किमी दूर असलेल्या तुरुंगात राहूनही तो निवडणुकीत विजयी होतो , यावरून पंजाबातील जनतेत खलिस्तानबद्दल आशावाद अजूनही शिल्लक आहे, असेच म्हणावे लागेल.  खलिस्तानी चळवळीचे गाडलेले भूत बाहेर काढण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे. त्याला भारतविरोधी आंतरराष्ट्रीय इकोसिस्टीमची साथ लाभत आहे, ही घडामोड चिंताजनक  आहे.    

  मुंबई तरुण भारत ७.६.२४

Powered By Sangraha 9.0