चित्रपटाला विरोध करणे निरर्थक

SV    26-Aug-2024
Total Views |
 
 भारतात ज्याप्रमाणे मुसलमानांच्या विरोधात बोलून पैसे कमविण्याचा काही राजकारण्यांचा धंदा आहे त्याचप्रमाणे चित्रपट निर्मिती व्यवसायात देखील मुस्लिम विरोधी चित्रपट निर्मिती करून पैसे छापण्याची स्पर्धा लागली आहे. मुसलमान भावनेच्या भरात हे विसरतात की असे मुस्लिम विरोधी चित्रपट मुद्दामहून तयार केले                जातात जेणेकरून आपण त्याचा जोरदार विरोध करू. आपल्या विरोधाचा परिणाम म्हणून काही लोक लगेच चित्रपटाच्या समर्थनार्थ उभे राहतील. नंतर टीव्ही, सोशल मिडीया, पेपर यामध्ये चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये चर्चा सुरू होईल. काही वेळेला तर चित्रपटाच्या निर्मात्यांकडूनच ठराविक लोकांना मिडीयात येऊन चित्रपटाचा विरोध करण्यासाठी पैसे दिले जातात. या लेखाच्या लेखकाला देखील अशीच एक ऑफर आली होती, अमुक एका चित्रपटाच्या विरोधात मिडीयामध्ये भाष्य करा, आपले नाव मोठे होईल, आपला सगळा खर्च केला जाईल. चित्रपटाच्या बाजूने बोलणारेदेखील अशाच             पद्धतीने उभे केले जातात. ज्या चित्रपटाच्या कथानकामध्ये सामान्य माणसाला काही रूची नाही त्या चित्रपटासाठी असाच  माहोल बनविला जातो.
अशाच पद्धतीचा एक चित्रपट सध्या चर्चेत आहे ज्यामध्ये मुसलमान अधिक मुले जन्माला घालतात असा नकारात्मक प्रचार केला आहे. सोशल मिडीया वरचे 'मुजाहिदीन' जोरदारपणे या चित्रपटाचा विरोध करताना दिसत आहे, इस्लामबद्दलचे तथ्य जोरकसपणे मांडत आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, हा चित्रपट अजून रिलीज झालेला नाही. चित्रपटाचा निर्माता चित्रपट रिलीज होण्याआधी त्यावर करोडो रुपये खर्च करतो जेणेकरून चित्रपट रिलीज झाल्यावर अधिकाधिक लोकांनी तो चित्रपटगृहात जाऊन पहावा. त्याचबरोबर भारतात सध्याची जी परिस्थिती आहे त्याचा विचार करता मुसलमानांनी कितीही विरोध केला तरीही चित्रपटावर प्रतिबंध घातला जाईल याची तीळमात्र शक्यता नाही. हे सोपे गणित ज्यांना समजत नाही त्यांना उपचाराची गरज आहे.
सोशल मिडीयावर मुसलमान अगदी पुण्यकर्म केल्यासारखे या चित्रपटाचा निषेध नोंदवित आहेत, यामुळे उलट चित्रपटाला प्रसिद्धी मिळत आहे. इस्लामचा नारा बुलंद करण्यासाठी आपण सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या कलाकारांचा फुकट प्रचार करीत आहोत. चित्रपट रिलीज झाल्यावर शक्यता आहे की तो फ्लॉप होईल, त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार नाही. किंवा प्रसिद्धीसाठी जे आधी दाखविले आहे तसे चित्रपटात नसेल आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. त्यावेळी आपण केलेला विरोध हा लाजिरवाणा ठरेल. इंटरनेटच्या जमान्यात एखाद्या पुस्तकाला, चित्रपटाला, व्हिडीओला विरोध करणे फायद्याचे नाही त्यापेक्षा चांगली कलाकृती बनवून प्रस्तुत करणे समजदारपणाचे आहे. आपण विरोध करून एखाद्या कलाकृतीवर बंदी घालू शकतो परंतु ते ओटीटी, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड झाले की लाखो लोक त्याला फुकटात कुठेही बघू शकतात.
आजकाल चित्रपटांचा विरोध करणे फायद्याचे नाही त्यामुळे या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा नंतर भ्रमनिरास होऊ शकतो. सोशल मिडीयावरील काही प्रभावी व्यक्ती आणि छोटे मिडीया चॅनेल अशा प्रकारच्या विरोधाला हवा देतात जेणेकरून त्यांची सुद्धा प्रसिध्दी होते. मुस्लिम तरूणांनी या निरर्थक प्रसिद्धीपासून दूर रहावे.
- मुहम्मद बुरहान अलादीन कासमी
तेहलका टाईम्स ३०.५.२४