नालंदा : ऐतिहासिक वारसा नव्या रुपात

SV    25-Sep-2024
Total Views |
 
 राजगिर- (बिहार) “नालंदा हे फक्त एक नाव नाही , ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आगीत जळली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे. नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.  
सुमारे १ हजार ६०० वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ जगातल्या पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते.
भारतात ज्या राजवटीमध्ये सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात त्या गुप्त राजघराण्याने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या पाचव्या शतकात  केली.  नालंदा इथे  एक आमराई होती तेथील विहाराला प्रत्यक्ष बुद्धांचे पाय लागले होते असे म्हणतात. याच नालंदा विहाराचे रुपांतर सम्राट कुमारगुप्ताने नालंदा विद्यापीठात केले.  नंतर सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी या विद्यापीठाला दिली. त्यांच्या उत्पन्नातून विद्यार्थ्यांच्या राहण्याचा तसेच जेवणाचा खर्च केला जाई. त्यानंतर बंगालच्या पाल राजांनी हे विद्यापीठ भरभराटीस आणले.
चीनी प्रवासी ह्यू -एन-त्संग ह्या विद्यापीठाची कीर्ती ऐकूनच भारतात आला. तिथे तो शांतरक्षित नावाच्या गुरूंकडे चार वर्षे शिकला.  या विद्यापीठात दहा मंदिरे, ध्यान मंदिरे, वर्ग, तळी आणि बागा होत्या. कोरिया, जपान,चीन, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया आणि तुर्कस्तान येथून विद्यार्थी शिकण्यास येत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात विद्यार्थ्याची मौखिक चाचणी होई, त्यात उत्तीर्ण झाल्यावर विद्यापीठात शिक्षण घेता येत असे. या विद्यापीठात घटिकायंत्राच्या सहाय्याने रोजचा दिनक्रम पार पडला  जाई. विद्यार्थी व शिक्षक दोघेही आठ तास काम करीत. ग्रंथालयाच्या तीन इमारती मिळून नव्वद लाख हस्तलिखिते जतन केली होती.
१२ व्या शतकात बख्तियार खिलजी या क्रूर आक्रमकाने हे विद्यापीठ जाळले. येथील  काही ग्रंथसंपदा तिबेटी व चीनी भाषेत आहे. भारतातले व परदेशातले अभ्यासक या भाषातील अनुवादांमधून मूळ संस्कृत भाषेत  ते ग्रंथ निर्माण करण्याचे काम करीत आहेत.
भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद देशांमधील सहकार्य म्हणून नालंदा विद्यापीठाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. पाटण्यापासून ९० किलोमीटर अंतरावर राजगिर इथे हे विद्यापीठ उभारले आहे. प्राचीन भग्नावशेषांच्या जवळच ही जागा आहे.
हे प्रांगण 'शून्य कार्बन उत्सर्जन' करणारे हरित प्रांगण आहे. ते सौर उर्जा संयंत्र, घरगुती व पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर  करणारे संयंत्र, १०० एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयंपूर्ण आहे.

मु.त.भा., लोकमत,
म.टा. २०.६.२४