नवीन अभ्यासक्रमात संस्कृत भाषा तज्ञांची आवश्यकता

SV    03-Sep-2024
Total Views |
 
    राष्ट्रीय शिक्षण नीती २०२० च्या क्रियान्वयनाच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या पातळीवर आता हालचाली वेगात सुरू आहेत. प्राचीन भारतीय विज्ञान- तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि त्यावर आधुनिक काळाला सुसंगत      असे संशोधन अत्यंत गरजेचे आहे. स्वामित्व म्हणजे    पेटंट जगतात मूळ  भारतीय असलेल्या परंतु प्रकाशात न आलेल्या अशा काही गोष्टींचे पेटंट जगातील अन्य कोणत्यातरी देशातील संशोधकाने घेतल्यानंतर आपल्या देशातील संशोधकांनी न्यायालयीन लढा देऊन असे गेलेले पेटंट परत आणले आहे. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू  नयेत म्हणून भारतीयांकडे असलेल्या परंतु अभ्यास न केल्यामुळे प्रकाशात न आलेल्या  अनेक ग्रंथांचा अभ्यास यापुढे होणे गरजेचे आहे.
    प्राचीन भारतीय ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची माहिती देणाऱ्या अनेक ग्रंथांची नावे ही सांगितली जातात. हे ग्रंथ सध्या कोठे उपलब्ध आहेत, प्रकाशित आहेत की हस्तलिखित स्वरूपात आहेत, त्या ग्रंथांची योग्य स्पष्टता, विवेचन, स्पष्टीकरण करणारी टीका किंवा भाष्य उपलब्ध आहेत का , याचाही शोध घेणे खूप गरजेचे आहे.
        भारतीय ज्ञान-विज्ञान परंपरा असे म्हटल्यानंतर सहजपणे लक्षात येते की, प्राचीन भारतीय ग्रंथांची भाषा म्हणजे संस्कृत या भाषेचे ज्ञान असणे जसे आवश्यक आहे तसेच संस्कृत भाषेच्या भाषिक ज्ञानाबरोबर वैज्ञानिक ग्रंथांचे अध्ययन आणि योग्य प्रकारे विवेचन करण्याची क्षमता असलेले विविध विद्वान, अभ्यासक्रम समित्यांमध्ये असणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेचे अध्ययन केलेले बहुतेक विद्वान काव्य, नाटक आणि वेदांत यामध्येच रममाण झालेले दिसतात. खूपच विरळपणे असे संस्कृत विद्वान दिसतात की जे वैज्ञानिक ग्रंथांचे विवेचन वैज्ञानिक पातळीवर आजच्या काळातही समजेल आणि प्रायोगिकदृष्ट्याही योग्य असेल अशा  पद्धतीने करताना दिसतात. आज किती संस्कृतज्ञ विविध विषयांच्या अभ्यासक्रम समित्यांमध्ये काम करण्यास   सक्षम आहेत याचा शोध घ्यावा लागेल. अशा विद्वानांचा  शोध घेऊन त्यांना अभ्यासक्रम समित्यांमध्ये समाविष्ट   करून घेणे आवश्यक आहे.
       शालेय जीवनात प्राचीन भारतीय विज्ञान तंत्रज्ञानाच्या भाषेचा संस्कृतचा परिचय होणे अत्यावश्यक वाटते. याच पायावर प्राचीन भारतीय ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सखोल अध्ययनाची इमारत उभी राहणार आहे.                              
डॉ. माधव केळकर, पुणे.