डाळ-बाटी हे एक लोकप्रिय पक्वान्न. आज राजस्थान किंवा मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमा ओलांडून ते देशभरात पोहोचले आहे. या पदार्थाची जन्मकथा मात्र अतिशय रंजक आहे.
राजस्थानातील मेवाड साम्राज्याचे संस्थापक बाप्पा रावळ यांच्या काळात युद्धावर जाण्यापूर्वी सैनिक कणकेचे गोळे वाळूत पुरून ठेवायचे. परत येईपर्यंत सूर्याच्या उष्णतेमुळे ते शिजलेले असायचे. स्वच्छ करून तूप चोळून ते खाल्ले की पोट भरले! याखेरीज बकरी किंवा उंटाच्या दुधापासून तयार केलेल्या दही किंवा ताकाबरोबर बाटी खाल्ली जायची.
बाटीबरोबर खाल्ली जाणारी पंचभेल डाळ गुप्तकालीन व्यापाऱ्यांबरोबर मेवाडमध्ये आली. ही डाळ गुप्तांच्या शाही दरबारात आवडीने खाल्ली जायची. जिरं, लवंग, वाळलेली लाल मिरची आणि इतर मसाले घालून चरचरीत फोडणी करायची आणि पाच डाळी एकत्र शिजवून त्यावर ओतायची.
बाटी तिखट डाळीबरोबर खातात तशी गोड चुरमा करूनही खातात. असं म्हणतात की, एका स्वयंपाक्याकडून करून ठेवलेल्या बाट्यांवर चुकून उसाचा रस सांडला. त्यामुळे बाटी मऊ होते हे त्याच्या लक्षात आले. मग बाटीवर उसाचा रस किंवा गुळाचे पाणी ओतण्यास सुरुवात झाली. त्याचं आजचं सुधारित रूप म्हणजे तूप, साखर आणि वेलदोड्याची पूड घालून केलेला चुरमा लाडू!!
पदार्थाची चव रसनेला तृप्त करते आणि जन्मकथा बुद्धीला. ही माहिती वाचून लवकरात लवकर डाळ बाटी करा आणि खाऊन पहा !!
बाट्या भाजण्याच्या अनेक पद्धती आहेत.गोवऱ्या पेटवून झगरं करून त्यात भाजतात. कुकरमध्ये उकडून मग कढईमध्ये तेल घालून त्यात तळतात. बाटी तंदूर नावाचा कुकर, ओव्हन यातही बाट्या भाजता येतात. सोलर कुकरमध्ये भाजलेल्या बाटीला छान सुगंध असतो.
मध्य प्रदेशात उकळलेल्या पाण्यात कणकेचे गोळे सोडून ते शिजल्यावर वर आले की काढतात. वाफेवर शिजवलेले म्हणून त्यांना बाफले म्हणतात.
बाटी करताना गव्हाचे पीठ, गव्हाचा रवा, मक्याचे पीठ यांचा वापर करतात. भरपूर तेल अथवा तूप घालून किंवा तेला/तुपात तळून मग बाटी खावी म्हणजे ती पचायला सोपे होते. बिहारमध्ये सातूच्या पिठाच्या बाट्या करतात. कार्यप्रसंगी पक्वान्न म्हणून बाटी केली जाते तेव्हा त्यात सुकामेवा घातला जातो. महाराष्ट्रात चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला नैवेद्य म्हणून डाळबट्टी व वांग्याची भाजी असा नैवेद्य असतो.
जागरण.कॉम