सर्वोत्कृष्ट चित्र

06 Sep 2024 10:43:01
 
 एक प्रसिद्ध चित्रकार होता. त्याने खूप चित्रे काढली होती. तरीसुद्धा आपण अजून सर्वोत्कृष्ट चित्र काढले नाही, असे त्याच्या मनाला वाटत होते. सर्वोत्कृष्ट चित्र काढण्यासाठी, विषय शोधण्यासाठी तो भटकत होता. भटकताना मध्येच त्याला एक ओळखीचे वयोवृद्ध पुजारी भेटले. बोलण्याच्या ओघात चित्रकाराच्या मनातील भाव त्यांना समजला. तेव्हा ते  त्याला म्हणाले , "चित्र काढताना एक गोष्ट तुम्ही जरूर लक्षात ठेवा. ती म्हणजे जगात सगळ्यात सुंदर काही असेल, तर ती म्हणजे माणसाची श्रध्दा." थोडे पुढे गेल्यावर त्याला एक रूपसंपन्न युवती भेटली. तिला त्याने आपल्या मनातील हेतू सांगितला. त्यावर ती म्हणाली, "सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे प्रेम म्हणजेच सौंदर्य.” आणखी काही अंतर चालल्यावर त्याला एक सैनिक भेटला. चेहऱ्यावरून तो थकलेला, कंटाळलेला वाटत होता. चित्रकाराने सैनिकालाही चित्रासंबंधी प्रश्न विचारून मार्गदर्शन करण्यास सांगितले. सैनिकाने उत्तर दिले, "शांततेशिवाय जगात काहीही चांगले नसते." मिळालेल्या उत्तरांवर विचार करीत करीत तो घरी आला. घरी येताच त्यात पत्नी समोर दिसली. मुले भोवती जमा झाली. मुलांच्या डोळ्यात त्याला श्रद्धा दिसली. पत्नीच्या रूपात त्याला प्रेमाचे दर्शन घडले. घरच्या वातावरणात शांतता अनुभवास आली. त्याला हवे त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यामुळे सर्वात उत्कृष्ट असे चित्र त्याने काढले. ते चित्र होते त्याच्या 'घराचे'.
तात्पर्य : घर बांधावयाचे नसते, तर उभारावयाचे असते. संसार ही संस्कारगंगा तर घर हे गंगेच्या तीरावरचे तीर्थ आहे. आईच्या प्रेमावर, वडिलांच्या कर्तृत्वावर, मुलांच्या श्रद्धेवर जे धडधाकट उभे राहते ते घर.

अनमोल बोधकथा
Powered By Sangraha 9.0