सूर्यास्तानंतर किंवा दिवेलागणीनंतर घरातला केर काढू नये
असे केल्याने दारिद्र्य येते असा समज आहे पण यामागचं शास्त्रीय
किंवा तार्कीकदृष्ट्या कारण असं आहे की
पूर्वी ज्यावेळी विजेच्या दिव्यांचा शोध लागला नव्हता त्यावेळी
बहुतेक विविध प्रकारच्या तेलाचे दिवे वापरत असत. त्या दिव्यांचा प्रकाश अतिशय मंद
असे तसंच ते सर्वत्र प्रकाश पसरावा म्हणून उंचावर ठेवले जायचे त्यामुळे जमिनीवर
तसा कमीच प्रकाश पडायचा. अशावेळी घरातील एखादी मौल्यवान वस्तू, दागिना (नथ, अंगठी वगैरे) किंवा पैसे जर जमिनीवर
पडले असतील तर कमी प्रकाशामुळे केराबरोबर ते घराबाहेर लोटले जाऊ शकत होते. याशिवाय
गावातली घरे जमिनीलगत असायची, पुढे मागे अंगण-परसदार असायचे,
घराभोवती बाग असायची. घरात जर साप, विंचू,
किंवा तत्सम सरपटणारे जनावर शिरले आणि एखाद्या कोपऱ्यात लपून बसले
तर दिवेलागणीनंतर केर काढताना ते दिसणार नाहीत आणि अनावधानाने त्यांना डिवचले जाऊन,
त्यांचा दंश होण्याचा धोका होता, म्हणून केर काढला जात नसे. थोडक्यात यामागे कुठलीही धार्मिक बाब नसून त्यामागे शास्त्रीय कारण आहे.