पुणे : “माझ्या कुटुंबात वाद झाला. मला
अचानक घरातून बाहेर काढलं. पण माझी एक मैत्रीण शासकीय सेवेत आहे. मुंढव्यातील एक पत्ता
दिला. मी खचले होते, पण मला खऱ्या अर्थाने आधार मिळाला तो 'सखी- एक थांबा केंद्रा'चा. मला योग्य आणि वेळेत
मार्गदर्शन मिळाल्याने मी माझ्या पायावर
उभी आहे” असं रेणुका
हिने सांगितलं आहे, (नाव बदलले आहे)
हिंसाचारग्रस्त, अत्याचारग्रस्त महिलांना तत्काळ मदतीसाठी मुंढवा भागात असलेले 'सखीः एक थांबा केंद्र' (वन स्टॉप सेंटर) केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून सुरू करण्यात आले आहे, इथे महिलांना निवारा मिळतोच त्याशिवाय आवश्यक असल्यास समुपदेशन आणि कायदेशीर मदतही पुरवली जाते. पुण्यात हे केंद्र मे २०२२ पासून सुरू असून आतापर्यंत ७८६ महिलांना मदत झाली आहे.
याबाबत केंद्र प्रशासक सविता भोर म्हणाल्या, "आम्ही केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणासाठी व त्यांच्या सुरक्षितता, कल्याण आणि आत्मनिर्भरतेसाठी सतत प्रयत्न करतो. आत्तापर्यंत महिला हेल्पलाइनवरून ८४३ आणि चाइल्ड हेल्पलाइनवरून एक हजार १७६ प्रकरणांत आम्ही मदत केली आहे."
सकाळ २३.१२.२४