ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या पत्रातील एका ओळीचा आधार घेत ‘फातिमा शेख’ या कथित पहिल्या मुस्लिम शिक्षिकेचे चरित्रच उभे करण्यात आले आहे. 'फातिमा शेख' (Fatima Sheikh) नावाने एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक असल्याचे जनमानसात रूजविण्यात आले आहे. त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. तसेच त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले, असेही सांगितले जाते. मात्र, याबद्दल कोणताही समकालीन पुरावा नाही. ९ जानेवारी २०२२ मध्ये गुगलने त्यांचे डूडल तयार केले. त्यानंतर फातिमा शेख यांच्या नावाने देशभरात कार्यक्रम आणि जलसे घेण्यात आले. फुले दांपत्याचे चरित्र अभ्यासक आणि सामाजिक चळवळींतील अग्रणी नेतृत्त्व दिवंगत हरी नरके यांनी फातिमा शेख यांच्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या अधिकृत एक्स हॅंडलवरून प्रश्न विचारत ते म्हणतात -
"फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त अभिवादन करणारे डुडल आणि त्यानंतर फेसबुकवर अभिवादनाचा वर्षाव सुरु आहे; आनंद आहे ! ही जन्मतारीख नेमकी कोणी शोधून काढली? कधी काढली? कशाच्या आधारे? कोणत्या दस्तऐवजात ही नोंद मिळाली हे मला समजून घ्यायला आवडेल.”
पुढे एका कमेंटला उत्तर देताना ते म्हणतात, "फातिमा यांचे लेखन सापडलेले नाही. त्यांचे फार त्रोटक उल्लेख मिळतात, त्याच्यावरून काही लोकांनी मनाने घडवलेल्या कहाण्या रचलेल्या आहेत." एका सुनियोजित पद्धतीने समाजात एखादे खोटे व्यक्तिचरित्र निर्माण केले जाते. त्या आधारावर एक संपूर्ण चळवळ एवढंच काय सरकारी धोरणही बदलले जाते. एक सार्वभौम आणि लोकशाही राष्ट्र म्हणून निश्चितच ही धोक्याची घंटा नाही का?
विश्व संवाद केंद्र , देवगिरी ८.१.२५