शेतीला दुग्धव्यवसायाची जोड

22 Jan 2025 10:26:57
 
         सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पश्चिम भाग दुष्काळी आहे. त्यामुळे या परिसरात शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तालुक्यातील हिंगणगाव येथील दीपक हिरालाल घाडगे यांची साडेचार एकर शेती आहे. शेतीला जोड म्हणून त्यांनीही दुग्ध व्यवसाय आकारास आणला आहे.
सुरुवातीला काही काळ नोकरी केल्यावर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्यास सुरुवात केली. घरी एक दोन म्हशी होत्या. धोम-बलकवडी कॅनॉल व विहिरीच्या पाण्यावर ते ऊस, कांदा, भाजीपाला, चारा पिके घेत होते. कोरोना काळात शेतमाल विक्रीची व्यवस्था बिघडली. त्यात नुकसान सोसावे लागले. पिके सोडून द्यावी लागली. कोरोना काळात, दुष्काळात आणि प्रत्येक उन्हाळ्यात दीपक यांना दुग्ध व्यवसायानेच तारून नेले आहे. त्यामुळेच  याच व्यवसायाचा विस्तार करण्याचे त्यांनी ठरविले. घराशेजारील मोकळ्या जागेत ५० बाय ४० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा बांधला. तसेच बांधीव शेडही उभारली. कमी खर्चात गोठा उभारणीला महत्त्व दिले. मुक्त संचार गोठ्यात कुक्कुटपालनही केले आहे,
अर्थकारण उंचावले -
          नंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने पशुधन वाढवत नेले. आजमितीला १० एचएफ गायी, दोन म्हशी व एक खिलार देशी गाय असे पशुधन दावणीला आहे. प्रति दिन ४० ते ४५ लिटर दुधाचे संकलन होते. गोविंद डेअरी येथे दुधाचा  पुरवठा होतो या व्यवसायातून घाडगे कुटुंबाचे अर्थकारण उंचाविण्यास मदत झाली आहे. चाऱ्यासाठी मुरघास युनिटही उभारले आहे.
आधुनिक बायोगॅस युनिट -
        दुग्ध व्यवसायातून उपलब्ध होत असलेल्या शेणापासून बायोगॅस (जैवइंधन) निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. त्याच अनुषंगाने इंधनात स्वयंपूर्ण होण्याची दिशा दीपक यांना मिळाली. त्यासाठी गोविंद डेअरीची योजना व त्या अंतर्गत आधुनिक, पर्यावरणपूरक बायोगॅस युनिटची (बायो डायजेस्टर) माहिती मिळाली. त्याचे अर्थकारण तपासून दीपक यांनी शेतात हे युनिट बसवले, मागील दोन वर्षांपासून कुटुंबाला त्याचा फायदा होऊ लागला आहे. युनिट उभारण्यासाठी ४९ हजार रुपये खर्च होता. मात्र दीपक यांना गोविंद डेअरीच्या योजनेमुळे अवघे पाच हजार रुपये त्यासाठी द्यावे लागले. जुलै, ऑगस्ट हा पावसाळ्याचा काळ सोडून दहा महिने पूर्ण क्षमतेने बायोगॅस मिळतो. सिलिंडरचा वर्षाचा दहाहजार रुपये खर्च वाचतो. युनिटमधून बाहेर पडणारी स्लरी खत म्हणून वापरता येते. त्यामुळे रासायनिक खतांवरचा खर्च कमी झाला. बायोगॅस युनिट देखभालीचा खर्चही दोन वर्षात शून्य झाला आहे. अल्पभूधारक शेतकरीही खर्चनियंत्रण करून शेतीचे गणित बसवू शकतो.

ॲग्रोवन १३.११.२४
Powered By Sangraha 9.0