संस्थेची भूमिका
‘सांस्कृतिक वार्तापत्र’ ही संघाची जागरण पत्रिका आहे, याची सुरुवात १९८३ साली झाली. आजचे पाक्षिकाचे स्वरूप २००० सालापासून सुरू झाले. ‘हिंदुंच्या हृदयांतील हिंदुत्वाची तार छेडणारे पाक्षिक’ या tagline खाली देशात घडणाऱ्या घटनांची माहिती गावात, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांना व्हावी, त्यावर त्यांनी विचार करावा आणि आपली राष्ट्रवादी विचारांची भूमिका निश्चित करावी या सामाजिक जाणिवेतून सांस्कृतिक वार्तापत्र चालवले जाते. यात दिले जाणारे वृत्त वैशिष्ट्यपूर्ण असावे यासाठी देशभरातील वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके अशा विविध नियतकालिकांचे वाचन करून त्यातील कात्रणे काढून त्यांची छाननी करून त्यातून निवडलेल्या बातम्या वाचकांना पुरवल्या जातात. याखेरीज देशहिताच्या नावावर समाजाची दिशाभूल करणाऱ्यांचे बुरखे फाडणारे वृत्तही अंकात वाचायला मिळते. उर्दू वृत्तपत्रातील तज्ज्ञ लोकांनी लिहिलेले विचार मराठीत भाषांतरित करून ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ या सदराखाली घेतले जातात. जेणेकरून आपल्या हिंदू समाजाला मुस्लीम समाज कसा विचार करतो हे लक्षात येऊ शकेल. सांस्कृतिक वार्तापत्राचा वाचकवर्ग ग्रामीण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कृषीविषयक माहिती अंकात प्रामुख्याने घेतली जाते. ग्रामीण क्षेत्रातील, वनवासी पाड्यावरील असंख्य वाचक सांस्कृतिक वार्तापत्राची आतुरतेने वाट पहात असतात. आजमितीला सांस्कृतिक वार्तापत्राचा वाचकवर्ग शहरी, ग्रामीण अशा सर्व भागात मिळून साधारणपणे लाखावर आहे. कृषीखेरीज महिला, बाल, पुस्तक परिचय, पर्यावरण, ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारी अशी इतरही सदरे असतात.
अन्य वैशिष्ट्ये
दरवर्षी नियमित २० अंक आणि १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी असे दोन विशेषांक प्रकाशित केले जातात. २०२३ सालापासून दिवाळी अंकदेखील सांस्कृतिक वार्तापत्राने सुरू केला आहे. वार्तापत्राचा नियमित अंक दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला प्रकाशित होतो तर हिंदी भाषेतील नियमित अंक दर महिन्याच्या ७ आणि २३ तारखेला प्रकाशित होतो. नियमित अंकाची पृष्ठसंख्या १६ तर विशेषांकाची १२५ ते १६० पर्यंत असते.