फळांची स्वच्छता व प्रतवारी
काढणीनंतर किडलेली, नासलेली, दबलेली, फुटलेली, खरचटलेली, तडा गेलेली फळे बाजूला करावी. त्यानंतर त्यांची वजन व आकारानुसार प्रतवारी करावी. प्रथम दर्जाची, आकर्षक, टवटवीत, मोठ्या आकाराची आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अशी फळे मोठ्या आणि दूरवरच्या बाजारपेठांसाठी पाठवावी. फळांची काढणी करुन ती शेतावर सावलीत जमा केल्यानंतर बागेत किंवा शेतावरील शेडमध्ये साळीचे तणीस पसरून घ्यावे, त्यावर काढणी केलेली फळे पसरावीत व २४ तास तशीच ठेवावीत. यामुळे फळातील उष्णता कमी होऊन फळात चाललेल्या मेटॉबोलिक क्रिया स्थिरावतील.
यानंतर फळे क्लोरिनच्या पाण्याने व नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. अशाप्रकारे धुतलेली फळे बुरशीनाशक द्रावणात ५ मिनिटे बुडवून ठेवावीत. या स्वच्छता प्रक्रियेमुळे पेनीसिलीय व अस्परजिलस या बुरशीमुळे होणारे रोग किमान ३ ते ४ आठवड्यापर्यंत नियंत्रणात राहतात. तसेच फळे धुतल्याने त्याचा मूळ रंग, चकाकी व ताजेपणा कायम राहण्यास मदत होते.
काढणीपश्चात व्यवस्थापन प्रक्रिया
फळांची काढणी करणे, करंड्या किंवा टोपलीत ठेवून पॅकिंग शेडमध्ये वाहतूक करणे, डिग्रीनिंगची प्रक्रिया करणे, फळांना हलकासा ब्रश फिरवून फळे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकविणे फळांना २,४ डी व मेणाच्या द्रावणात बुडविणे, फळांच्या रंगावरून मशिनद्वारे प्रतवारी करणे, फळांची १२.८ ते १४.४ अंश सेल्सिअस तापमानाला १ ते ५ महिन्यापर्यंत साठवण करणे, खराब फळे बाजूला करणे, पुन्हा साबणाच्या बुरशीनाशकाच्या द्रावणात फळे धुवून त्यांच्यावरून हलकासा ब्रश फिरविणे, प्रतवारी करणे, फळे खोक्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करणे व वाहतूक करणे.
कृषि पणन मित्र- नोव्हेंबर २०२४