धुळे जिल्ह्यातील बारीपाडा (ता.साक्री, जि. धुळे) या वनवासी, आदिवासीबहुल क्षेत्रात अनेक संकटे, अडचणींचा डोंगर पार करून चैत्राम पवार यांनी जिद्द, कष्टी वृत्तीतून उजाड शिवार हिरवेगार केले. जलस्त्रोत जिवंत केले. एकेकाळी ओसाड अशा या बारीपाड्यात जल, जमीन, जंगल यांच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक शेतीचे मॉडेल उभे करणाऱ्या चैत्राम पवार यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने धुळे (खानदेश) जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रतिकूलतेतून विकासाचा मार्ग
बारीपाड्याची १९९१-९२ पूर्वीची स्थिती बिकट होती. पांझरा नदीचा उगम या गावात आहे. मात्र डोंगराळ क्षेत्र असल्याने नदीचे पाणी वाहून जायचे. उजाड, ओसाड माळरान, पाणीटंचाई अशी संकटे, वृक्षतोड व अन्य समस्याही होत्या. जैवविविधता नष्ट होत होती. यातून शेती संस्कृती धोक्यात आली होती. परिसरातील ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले होते. शेती पाऊस पाण्यावर अवलंबून होती. पाऊस कमी झाल्यास किंवा दुष्काळी स्थिती राहिल्यास जेमतेम एखादा हंगाम हाती यायचा. पशुपालन, शेळी पालन याबाबत संकटे होती.
बारीपाडा मॉडेल तयार झाले
या काळात चैत्राम यांचा वनवासी कल्याण आश्रम संस्थेशी संपर्क आला. ध्येयवेड्या चैत्राम यांनी बँक व भारतीय वायूसेनेकडून नोकरीची आलेली संधी नाकारत गावासाठी विकासकार्य सुरू केले. वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या चैत्राम यांनी ग्रामस्थांना संघटित करण्यास सुरवात केले. गावात माती, पाण्याचे संवर्धन होऊ केले. वृक्ष लागवड झाली. पारंपरिक वाणांच्या संवर्धनावर भर दिला. ओसाड, उजाड माळरान, शिवार हिरवेगार होऊ लागले. गावातील सुमारे ४४५ हेक्टर क्षेत्राला नवसंजीवनी त्यातून मिळत गेली. गावातील जैवविविधता वाढीस लागली.
चैत्राम यांच्या प्रयत्नांतून परिसरातील प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. जलसंधारण, जैव विविधता संवर्धन, महिला सक्षमीकरण व लोकसहभाग यातून शाश्वत विकासाचे मॉडेल बारीपाड्यात उभे झाले. बारीपाड्यासह साक्री तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्रेरणा व गती देण्याचे काम चैत्राम यांनी केले. आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट अशा मान्यवर संस्थांमधील विद्यार्थी बारीपाड्यात येऊन अभ्यास करतात. बारीपाड्यात त्यांनी ‘ रानभाजी महोत्सव’ सुरू केला. असे महोत्सव राज्याचा कृषी विभागही सर्वत्र घेत आहे.
कार्याचा सन्मान
चांगले गाव कसे असावे याविषयी ७८ देशांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात बारीपाडा गावाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बारीपाडा प्रकल्पास मानाचा आयएफएडी (IFAD) या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. अॅग्रोवन मधून त्यांची यशकथा तसेच प्रयोगांची वेळोवेळी दखल घेण्यात आली असून उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
अॅग्रोवन २८.१.२५